पुणे शहरात येत्या १५ जून ते २४ जूनपर्यंत सर्व जड व अवजड वाहनांना प्रवेश बंदी
पुणे, ता. १२ - पुणे शहरात येत्या १५ जून ते २४ जून या दहा दिवसांच्या कालावधीत सर्व जड व अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी (ता. ११) याबाबतचा आदेश दिला आहे. अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरात सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई आणि सातारा या प्रमुख पाच बाजूंनी येणाऱ्या अवजड आणि मल्टी-अॅक्सल वाहनांमुळे दररोज वाहतूक कोंडी आणि गंभीर अपघात होत आहेत. केवळ २०२६ मध्येच शहरात जड वाहनांमुळे ३० प्राणांतिक अपघातात ३१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर १० दिवसांसाठी ही प्रवेश बंदी लागू केली आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
जड वाहनांसाठी असे असतील पर्यायी मार्ग -
- सोलापूरकडून मुंबईकडे जाणारी वाहने केडगाव चौफुला न्हावरे शिक्रापूर चाकण मार्गे किंवा उरळी कांचन -कोरेगाव मूळ - आष्टापूर शिक्रापूर चाकण मार्गे वळविण्यात येणार आहेत.
- मुंबईकडून सोलापूरकडे जाणारी वाहने तळेगाव दाभाडे चाकण शिक्रापूर- न्हावरे केडगाव चौफुला मार्गे जातील. मुंबई ते अहिल्यानगर वाहतूक : तळेगाव चाकण खेड मंचर- आळेफाटा मार्गे किंवा नाशिक फाटा -भोसरी - चाकण - शिक्रापूर मार्गे वळविण्यात येणार आहे.
- अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट -
पेट्रोल, डिझेल, दूध आणि शेतीमाल वाहून नेणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या बंदी आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच, ज्या वाहनांना पुणे शहरात माल उतरवणे अत्यंत आवश्यक आहे, अशा वाहनांना वाहतूक शाखेची ७२ तास आधी परवानगी घेऊन रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेतच शहरात प्रवेश करता येईल.