गुणवत्तावाढीसाठी महापालिकेच्या शाळांमध्ये होणार बदल, राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रेय वारे यांचे मार्गदर्शन लाभणार
गुणवत्तावाढीसाठी महापालिकेच्या शाळांमध्ये होणार बदल, राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रेय वारे यांचे मार्गदर्शन लाभणार
पिंपरी, ता. १२ -शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी आणि खेडतालुक्यातील जालिंदरनगर येथील शाळांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रेय वारे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास घडवणारे प्रयोग केले आहेत. आता वारे गुरुजींच्या मार्गदर्शनाने येणाऱ्या शैक्षणिक वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्येही बदल केले जाणार आहे. त्याची सुरवात भोसरीतील शाळेपासून करण्यात आली आहे. या बदलांमधून महापालिकेच्या शाळांचा दर्जा आणखी उंचावणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी (ता. ११) दिली.
मोरवाडी-पिंपरी येथील महापालिकेच्या दिव्यांग भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या, उद्योग समूहांसोबत संवाद बैठकीत महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठीच्या उपक्रमांबाबत चर्चा झाली. यावेळी, सहभागी कंपन्यांना वारे गुरुजींनी केलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रेय वारे यांचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महापौर लांडगे म्हणाले, ''राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी शासकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये केलेले कार्य प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. त्यांनी विकसित केलेली शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी मार्ग त्यांनी दाखवून दिला आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी घडवून आणलेली सकारात्मक क्रांती ही केवळ काही शाळांपुरती मर्यादित नसून ती राज्य आणि देशपातळीवर विस्तारत आहे.त्यांचे अनुकरण केले पाहिजे.''
दत्तात्रय वारे यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, गेली तीन दशके मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून या प्रवासात शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. आजही देशातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करण्याची आवश्यकता असून विशेषतः शासकीय शाळांच्या गुणवत्तावृद्धीसाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासकीय शाळा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाल्या तर पालकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितपणे बदलेल. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे आणि सरकारी शाळांचा दर्जा उंचावणे हेच माझे ध्येय राहिले आहे. यासाठी माझ्याकडे असलेले ज्ञान, अनुभव आणि शैक्षणिक नवकल्पना समाजाच्या हितासाठी वापरण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे.
शिक्षण क्षेत्रातील हे कार्य कोणत्याही एका व्यक्तीचे नसून सामूहिक प्रयत्नांमधून घडणारी चळवळ आहे. या उपक्रमामध्ये राज्यभरातील अनेक शिक्षक उत्साहाने सहभागी झाले असून विद्यार्थीकेंद्रित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ते कार्यरत आहेत. शासकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्यासाठी आयुष्याचा पूर्ण वेळ या कार्यासाठी समर्पित करण्याची माझी तयारी आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी सुरू केलेली ही मोहीम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्याचा आमचा मानस आहे.

दत्तात्रय वारे गुरूजी यांनी केलेले कार्य
दत्तात्रय वारे यांनी जिल्हा परिषद शाळा, वाबळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे कार्यरत असताना अवघ्या तीन वर्षांत शाळेतील विद्यार्थी संख्या ३२ वरून ७२१ पर्यंत वाढविली. त्यांच्या प्रयत्नांमुळे या शासकीय शाळेत प्रवेशासाठी तब्बल ५ हजार विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी निर्माण झाली. वाबळेवाडी शाळेला भारतातील पहिली ‘शून्य ऊर्जा’ (झिरो एनर्जी) शाळा म्हणून ओळख मिळाली असून महाराष्ट्र शासनाने २०१६ मध्ये या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेचा मान प्रदान केला. विशेष म्हणजे कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व प्रवेश परीक्षांमध्ये शंभर टक्के यश मिळविले. त्यांच्या अध्यापन पद्धतीवर आधारित शासकीय शिक्षण मॉडेल विकसित करण्यात आले असून या मॉडेलच्या आधारे महाराष्ट्रातील सुमारे साडेचार लाख शिक्षकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा, जळिंदरनगर (ता. खेड, जि. पुणे) येथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. अवघ्या दोन वर्षांत या शाळेतील विद्यार्थी संख्या ३ वरून १५० पर्यंत वाढली असून प्रवेशासाठी सुमारे ५०० विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार झाली आहे. दुर्गम भागातील ही शाळा जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धेत ‘टॉप १०’ मध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरली. शासकीय शाळा असूनही जागतिक स्तरावर सर्वोत्तम शाळांपैकी एक म्हणून या शाळेचा गौरव झाला आहे.
वारे यांनी भारतीय परिस्थितीला सुसंगत आणि जागतिक शिक्षण व्यवस्थेला समकक्ष अशी पर्यायी शिक्षण प्रणाली विकसित केली. या शैक्षणिक मॉडेलच्या विकासासाठी भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद (आयआयएम अहमदाबाद) हे ज्ञानसहभागी म्हणून कार्यरत असून या पद्धतीच्या माध्यमातून राज्यातील तसेच देशभरातील हजारो शाळांच्या विकासाची प्रक्रिया सुरू आहे. या शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना २०१६ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय सृष्टी सन्मान पुरस्कार, अहमदाबाद, वर्ल्ड्स बेस्ट स्कूल अवॉर्ड्स २०२५ तसेच कम्युनिटी चॉईस अवॉर्ड – बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.