शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणी आंदोलन व 'रास्ता रोको' करण्यास मनाई, पोलिसांचा आदेश जारी
शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणी आंदोलन व 'रास्ता रोको' करण्यास मनाई, पोलिसांचा आदेश जारी
पुणे, ता. ६ - नसरापूर येथील अत्याचाराच्या घटनेनंतर नवले पुलावर झालेल्या ठिय्या आंदोलन झाले. त्यानंतर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवले पुलासह शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणी आंदोलन आणि 'रास्ता रोको' करण्यास मनाई केली आहे. तसे आदेश जारी करण्यात आले आहेत.
नवले पुलावर केलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. चारही बाजूंनी भीषण वाहतूक कोंडी झाल्याने अनेक तास अडकून पडलेल्या वाहनचालकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. अनेकदा आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. परिणामी, कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी आंदोलनास मज्जाव केला आहे
यापुढे नवले पूल परिसर तसेच शहरातील कोणत्याही संवेदनशील चौकांमध्ये किंवा रस्त्यांवर आंदोलनास किंवा 'रास्ता रोको'ला पोलिसांकडून कोणतीही परवानगी दिली जाणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.