पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात, ७ मे पासून जमिनमालकांना पैसे वाटप होणार
May 05 2026
11
पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात, ७ मे पासून जमिनमालकांना पैसे वाटप होणार
पुणे, ता. ५ - पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. जमिनीच्या मोबादला दर निश्चित करण्यात आला आहे. ७ मे २०२६ पासून पैसे वाटप सुरु होणार आहे. जमिनींचे संपूर्ण अधिग्रहण होताच विमानतळाचे काम ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि सासवड एसडीएम कार्यालयाच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. सात गावांमधील एकूण १२१६ हेक्टर जमीन आणि अतिरिक्त २४२ एकर जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना व्याजासहित एक एकरला १ कोटी ६१ लाख १ हजार ९२५ रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. फळबागा असल्यास दुप्पट दर देण्यात येणार आहे. विहिरी आणि बोरवेलचेही स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले आहेत. ७ मे २०२६ पासून पैसे वाटप सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे घेऊन संबंधित कार्यालयात येणे आवश्यक आहे. करारनामा झाल्यानंतर आरटीजीएस द्वारे थेट खात्यात पैसे जमा केले जातील. ही प्रक्रिया १० जून २०२६ पर्यंत चालणार आहे. ज्यांची सहमती असेल त्यांना प्रथम पैसे दिले जातील. सहमती न देणाऱ्यांची जमीन सक्तीने भूसंपादन प्रक्रियेद्वारे घेतली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
भूसंपादन प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने सात पथके तयार केली आहेत. त्यांच्यामार्फत अधिग्रहण प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात येणार आहे. जमीन दिली नाही तर जास्त पैसे मिळतील, अशा अफवा पसरवल्या जात आहेत, मात्र सर्व शेतकऱ्यांना सारखाच दर लागू राहणार आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही संभ्रमात राहू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी आहे.