पिंपरी-चिंचवड : युवा नेते राजेंद्र बाळासाहेब तरस यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. वाढदिवसाच्या समारंभावरील खर्च टाळून ती रक्कम दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी देण्यात आली.
या उपक्रमांतर्गत ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती राजेंद्र तरस यांनी दिली.
दुष्काळग्रस्त भागातील अनेक कुटुंबांना पाणीटंचाईबरोबरच आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत वाढदिवसाच्या समारंभावर खर्च करण्याऐवजी ती रक्कम गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतल्याचे राजेंद्र तरस आणि ऐश्वर्या तरस यांनी सांगितले.
“वाढदिवस साजरा करण्यापेक्षा एखाद्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे, हाच खरा वाढदिवस,” अशी भावना त्यांनी निवेदनातून व्यक्त केली. यापुढेही सामाजिक उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले.