शहरात श्रीरामनवमी आनंदात साजरी, उपनगरांमध्ये मिरवणूकांचे आयोजन
पिंपरी, ता. २६ - प्रभू श्री रामाचा जन्मसोहळा, रामकथा किर्तन, प्रवचन, महापूजा, अभिषेक अशा धार्मिक कार्यक्रमांनी गुरुवारी (ता. २६) शहरात सर्वत्र श्रीरामनवमी भक्तीभावाने साजरी करण्यात आली. सायंकाळी शहरात अनेक ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची आणि प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
शहरातील श्रीरामाच्या मंदिरांमध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम जन्मसोहळा सर्वत्र महिलांनी पारंपरिक पद्धतीने साजरा केला. जन्मसोहळ्यासाठी भगिनींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शहरातील श्रीराम मंदिरांमध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.
सायंकाळी मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. निगडी-प्राधिकरण, भोसरी, चिंचवडगाव, डांगे चौक, संत तुकारामनगर येथे रात्री मिरवणूका काढण्यात आल्या.