शहरात आर. एम. सी. मिक्सर वाहनांच्या वाहतूकीच्या वेळेत बदल
पिंपरी, ता. २९ जुलै २०२६ - पुणे व पिंपरी-चिंचवडमधील आर. एम. सी. मिक्सर वाहनांच्या वाहतूकीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड वाहूतक शाखेने आर. एम. सी असोसिएशनसोबत झालेल्या संयुक्त बैठकीनुसार घेतला आहे. त्यानुसार, पिंपरी चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी वाहतूकीतील बदलांचे आदेश जारी केले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्यासाठी यापूर्वी आरएमसी मिक्सर वाहनांबाबत जे काही निर्बंध असतील ते रद्द करून नवीन आदेश केला जात आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक २९ जुलै २०२६ रोजी पासून सुरु होईल आणि आर.एम.सी बाबत अंतिम कार्यपद्धती (Standard Operating Procedure) तयार होईपर्यंत लागू राहील.
आदेशानुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत शनिवार आणि रविवारी दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत बंदी कायम ठेवून उर्वरीत वेळी आरएमसी वाहतुकीला प्रवेश बंदीतून शिथिलता देण्यात येत आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या आठवड्यातील पाच दिवसांमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आरएमसी वाहतुकीस प्रवेश बंदीतून शिथिलता देण्यात येत आहे.
याशिवाय, आर.एम.सी वाहनांवर ३६० डिग्री कॅमेरा बसविणे अथवा वाहनांसोबत क्लिनर ठेवणे बंधनकारक आहे. त्यासाठी एक महीना मुदत राहील, प्रत्येक प्लॅट धारकांनी डी.डी मशीन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मिक्सर वाहन प्लांटमधून बाहेर पडताना सदर मशिन व्दारे तपासणी करणे आवश्यक आहे, सदरचे बदल हे एक महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर लागू राहतील, सदर आदेशामध्ये हायवा, डंपर, ट्रक व इ. जड वाहनांच्या वाहतुकीत कोणतेही बदल अथवा शिथिलता देण्यात आलेली नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
- वाहतूक निर्बंध, Traffic Restrictions
- आरएमसी असोसिएशन, RMC Association, विक्रांत देशमुख, Vikrant Deshmukh, पोलिस उपायुक्त, Deputy Commissioner of Police
- वाहतूक शाखा, Traffic Police, पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिस, Pimpri Chinchwad Traffic Police
- आरएमसी मिक्सर वाहन, RMC Mixer Vehicle, वाहतूक वेळ बदल, Traffic Timing Change