आरटीई प्रवेशासाठी प्रवेशपत्र व आधार कार्ड असलेल्या पालकांनाच उन्नत केंद्रात प्रवेश
पिंपरी, ता. ५ - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) आपल्या मुलीचा प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या एका पालकांना ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आकुर्डी उन्नत शहर साधन केंद्रात (ACB)रंगेहात पकडल्याची घटना नुकतीच समोर आली. या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने कडक नियमावली लागू केली आहे. प्रवेश पत्र आणि आधार कार्ड असलेल्या पालकांनाच केंद्रात प्रवेश देण्याचे आदेश सोमवारी (ता. ४) शिक्षण विभागाने दिले आहेत.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत आकुर्डी व पिंपरी उन्नत शहर साधन केंद्रांमध्ये पहिल्या फेरीत ४ मेपर्यंत एकूण ३ हजार ७विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. यामध्ये आकुर्डी केंद्रांतर्गत ११५ शाळांमध्ये २ हजार ६२९ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी २ हजार ४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, ३४ अर्ज नामंजूर झाले व ५४८ जागा अद्याप रिक्त आहेत. पिंपरी केंद्रांतर्गत ६४ शाळांमध्ये १ हजार ३०२ विद्यार्थ्यांची निवड केली होती. त्यापैकी ९६० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून ३७ अर्ज नाकारले आहेत. येथेही ३०५ जागा रिक्त आहेत, अशी माहिती प्रशासनाधिकारी संगीता बांगर यांनी दिली.
आर.टी.ई. अंतर्गत राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया ही शासनाच्या नियमांनुसार पूर्णपणे पारदर्शक, ऑनलाइन व विनामूल्य राबविण्यात येते. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही तसेच अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणी, संगणकीय लॉटरी व प्रवेश निश्चिती या सर्व टप्प्यांमध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा मध्यस्थाची आवश्यकता नसते, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. गैरपरकारांपासून पालकांना सतर्क राहण्याच्या सूचना पालकांना दिल्या आहेत.