महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक कशी जिंकली याची चर्चा पुरे, उद्दीष्टपूर्तीसाठी कार्यवाही करा - मंत्री चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक कशी जिंकली याची चर्चा पुरे, उद्दीष्टपूर्तीसाठी कार्यवाही करा - मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, ता. २३ - ''महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक आपण निवडणूक कशी जिंकली, याची चर्चा करणे बंद करा. ज्या कारणासाठी जिंकलो त्याचा आराखडा तयार करुन त्याची कार्यवाही करावी. दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा, ''अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला केली.
साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या साहित्य संवर्धन आघाडीच्या विजयी उमेदवारांच्या स्नेहमेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, स्थानिक कार्यवाह सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार, डॉ. नितीन संगमनेरकर यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे आणि प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यावेळी उपस्थित होते.
पांडे म्हणाले, ''महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था कोणा व्यक्तीची नाही, तर मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची आहे. मिळालेले यश हा सामूहिक शक्तीचा आविष्कार आहे.''
परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण म्हणाले, ''आम्हा सर्वांवर फार मोठी जबाबदारी आली याची जाणीव आहे. १०० वे अखिल भारतीय मराठी संमेलन उत्तम करायचे यात शंका नाही. पण, कसे करतात बघू, असे म्हणणारे लोकही आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे संमेलन देदीप्यमान करायचे आहे.''