क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ७ ऑगस्ट २०२६
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 मारुंजीमध्ये प्रेमप्रकरणातून २२ वर्षीय तरुणाचा खून, तरुणीला जबर मारहाण
स्वतःची प्रेयसी मॅनेजरसोबत राहात असल्याच्या कारणावरुन एका तरुणाने त्या २२ वर्षीय तरुणाचा लोखंडी रॉड डोक्यात मारुन खून केला. ही घटना गुरुवारी (ता. ६) मुळशी तालुक्यात मारुजी येथील वैष्णवी पेईंग गेस्टमध्ये दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे. आरोपीने त्याच्या प्रेयसीलाही जीवे मारण्यासाठी लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत, वैष्णवी पेईंग गेस्टच्या मालक नरसिंम्मा तिरुपालु दरिशी यांनी पोलिसांत तक्रार दिली. आरोपीचे नाव दिनेश महादेव झांबरे (रा. पंढरपूर जि. सोलापूर) असे आहे.
आरोपी दिनेशची प्रेयसी निकीता शिवाजी दनाणे (वय २१) ही पेईंग गेस्टचा मॅनेजर सागर साहेबराव गायकवाड (वय २२) याच्यासोबत राहत होती. त्यामुळे रागाने आरोपी दिने गुरुवारी (ता. ६) तिथे कारमधून आला. सागर गायकवाडला लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करुन ठार केले. प्रेयसी निकीतालाही हीस जीवे ठार मारण्याचे उद्देशाने लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. पोलिसांनी आरोपी दिनेशला अटक केली आहे. आरोपीवर हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम. १०३ (१) १०९ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून एकाला फरशी, दगड, विटांनी मारहाण
जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून ४३ वर्षीय इसमाला तिघांनी फरशी, दगड आणि विटांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार ५ ऑगस्टला विजयनगर-दिघी येथे गुलमोहोर सोसायटीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात सायंकाळी ५ च्या सुमारास घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणी तन्मय प्रविण शिंदे (वय २२ वर्ष) याने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपींची नावे रोहन उर्फ मोन्या संजय माने (वय २२, रा. डोळस वस्ती, दिघी), युवराज मते (वय अंदाजे ४०, रा. गणेशनगर, बोपखेल) आणि श्रीमती जना रोहन माने (वय ३३, रा. दिघी गावठाण) अशी आहेत. आरोपींनी फिर्यादी तन्मयचे काका प्रफुल्ल वसंत शिंदे (वय ४३) यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने फरशी, दगड आणि विटांच्या सहाय्याने डोक्यावर व चेहऱ्यावर मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून आरोपींनी हा हल्ला केला. आरोपी अटकेत आहेत. आरोपींविरुद्ध गुरुवारी (ता. ६) दिघी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 बँकेच्या ताब्यातील ५६ लाखांची फॉर्च्युनर पळवली; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
संभाजीनगर-चिंचवड येथील श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक लिमिटेडच्या ताब्यात असलेली टोयोटा फॉर्च्युनर कार एका ३५ वर्षीय तरुणाने परवानगीशिवाय नेली आहे. हा प्रकार २६ जून २०२५ रोजी थरमॅक्स चौक, संभाजीनगर, चिंचवड येथील बँकेसमोरील मुख्य रस्त्यावर घडला आहे. या प्रकरणी आरोपी तरुणावर गुरुवारी (ता. ६) निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संजय वासुदेव जोशी (वय ६७) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव हसमुख राजाराम भाटी (वय ३५ वर्ष, व्यापार, रा. माणिकबाग, पुणे) असे आहे. आरोपीच्या पत्नी पिंकी हसमुख भाटी यांनी टोयोटा फॉर्च्युनर खरेदीसाठी श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेतून ४२ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज प्रक्रियेदरम्यान त्यांनी दिलेला निवासी व व्यावसायिक गाळा त्यांच्या नावावर नसल्याचे बँकेच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे, संबंधित फॉर्च्युनर कार सिंहगड पोलिस ठाण्याकडून बँकेच्या ताब्यात देण्यात आली होती. २६ जून २०२५ रोजी आरोपीने बँकेच्या ताब्यात असलेली फॉर्च्युनर कार बँकेची परवानगी न घेता, दिशाभूल करून व लबाडीच्या उद्देशाने नेली आहे. या कारची मूळ किंमत ५६ लाख रुपये असून त्यापैकी बँकेचे कर्जाची रक्कम ४२ लाख रुपये आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ६) भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२), ३१६, ३१७ (२), ३१८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 ताथवडेतील पोदार स्कूलमधील सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूप्रकरणी प्राचार्य व प्रशासनावर गुन्हा दाखल
ताथवडे येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्य प्रवेशद्वाराचा लोखंडी गेट अंगावर पडून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी शाळेचे प्राचार्य व प्रशासनाविरोधात गुरुवारी (ता. ६) वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) अंतर्गत करण्यात आली आहे.
याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक राजू शिवाजी पांढरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोदार इंटरनॅशनल स्कूल, ताथवडे येथील गेटच्या देखभाल, सुरक्षितता आणि व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या संबंधित व्यक्तींनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.१० वाजता शाळेचे सुरक्षा रक्षक संजय नागनाथ कांबळे (रा. अशोकनगर, ताथवडे) हे मुख्य प्रवेशद्वार उघडत असताना लोखंडी गेट अचानक त्यांच्या अंगावर पडले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान २ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा, वैद्यकीय कागदपत्रे, एमएलसी, शवविच्छेदन अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. प्राथमिक तपासात शाळेचे मुख्य गेट कमकुवत अवस्थेत असून त्याची वेळोवेळी तपासणी, दुरुस्ती, मजबुतीकरण आणि आवश्यक सुरक्षितता उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे निष्पन्न झाले, असे पोलिसांनी नमूद केले आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 गॅस सिलिंडर बदलताना निष्काळजीपणा; वाकडमधील हॉटेलला आग, तरुणाचा मृत्यू
थेरगाव हद्दीतील डांगे चौक परिसरातील हॉटेल दिल्ली - ६ मध्ये गॅस सिलिंडर बदलताना गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत एका तरुणाचा श्वास गुदमरून व भाजून श्वास गुदमरून मृत्यू झाला. ही घटना २ ऑगस्ट रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुरुवारी (ता. ६) वाकड पोलिस ठाण्यात आरोपी मुकेश बिष्णोई (वय अंदाजे २५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांगे चौक येथील आम्मा बाबा ज्ञानजी आशीर्वाद कॉम्प्लेक्समधील गाळा क्रमांक ३ मध्ये असलेल्या ‘हॉटेल दिल्ली-६’ येथे ही घटना घडली. आरोपी मुकेश बिष्णोई (वय अंदाजे २५, रा. लक्ष्मीनगर, हिंजवडी, पुणे; मूळ रा. राजस्थान) हा हॉटेलमध्ये गॅस सिलिंडर पुरवण्यासाठी आला होता. त्याने सिलिंडर बदलताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने गॅस गळती झाली आणि अचानक मोठी आग लागली. या आगीत भुरा ऊर्फ मोहम्मद शहजाद (वय २२, रा. उत्तर प्रदेश; सध्या रा. डांगे चौक, वाकड) याचा गंभीर भाजल्यामुळे मृत्यू झाला. आगीत हॉटेलचेही मोठे नुकसान झाले.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक ललित सुकदेव मोरे यांनी फिर्याद दिली. आरोपीवर गुरुवारी (ता. ६) वाकड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६ (१) आणि ३२४ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात सुरक्षा रक्षकाच्या धक्क्याने तरुणाचा हात फ्रॅक्चर
महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयातील जनरल मेडिसिन वॉर्डमध्ये सुरक्षा रक्षकाने धक्का दिल्याने एका २१ वर्षीय तरुणाचा डावा हात फ्रॅक्चर झाल्याची घटना २९ जुलैला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी गुरुवारी (ता. ६) काळेवाडी पोलिस ठाण्यात सिक्युरिटी गार्डविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी रमेश सुदाम भवाळ (वय २१, रा. काळाखडक, मुकाई चौक, रावेत, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्या सिक्युरिटी गार्डचे नाव प्रकाश शिनगारे (वय ५५, रा. बेरगाव, पुणे) असे आहे. फिर्यादी रमेश हे वडिलांच्या पलंगाजवळील जागेत झोपले होते. त्यावेळी वॉर्डमधील सुरक्षा रक्षकाने त्यांना उठवून बाहेर जाण्यास सांगितले. फिर्यादी वॉर्डबाहेरील पॅसेजमधील बाकड्यावर बसण्यासाठी जात असताना सुरक्षा रक्षकाने पाठीमागून ओढून लोखंडी बाकड्यावर ढकलले. त्यामुळे रमेश यांच्या डाव्या हाताच्या दंडाचे हाड मोडले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात काळेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 सुरक्षा पर्यवेक्षकावर लोखंडी रॉडने हल्ला, मावळ तालुक्यातील घटना
कामावरुन पायी घरी जात असलेल्या सुरक्षा पर्यवेक्षकावर अज्ञात व्यक्तीने लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना मावळ तालुक्यातील सुंदवडी गावच्या हद्दीत ५ ऑगस्टला सकाळी ७ च्या सुमारास घडली. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, सुरक्षा पर्यवेक्षक अमरजित श्रीहरीराम कुमार (वय ३२, रा. खालुंब्रे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी अमरजित दिनांक ५ ऑगस्टला सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास मौजे संदवडी गावच्या हद्दीतील देहफाटा परिसरात घडली. फिर्यादी हे ड्युटी संपवून खालुंब्रे येथे रस्त्याच्या कडेने पायी जात होते.
त्यावेळी अचानक एका अज्ञात व्यक्तीने समोर येऊन त्यांच्या डोक्यावर तसेच चेहऱ्याच्या डाव्या बाजूस लोखंडी रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात ते जखमी झाले.
अज्ञात आरोपीचे वय अंदाजे ३० वर्षे असून त्याची उंची सुमारे ५ फूट ६ इंच, रंग सावळा, अंगात विटकरी रंगाचा टी-शर्ट व हाफ पॅन्ट असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.
या प्रकरणी आरोपीवर गुरुवारी (ता. ६) तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 चिखलीतून दुकानासमोर लावलेली दुचाकी चोरीला
दुकानासमोर पार्क केलेली होंडा शाईन दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना चिखली परिसरात घडली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अकरम सुबेदार हुसेन (वय ५५, रा. रिव्हर रेसीडन्सी, जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.२० ते ११.४५ वाजण्याच्या दरम्यान पवार वस्ती, चिखली येथील दिपक यादव यांच्या जागेतील कोहिनूर वजन काट्याजवळ घडली. फिर्यादी यांनी त्यांची होंडा शाईन दुचाकी दुकानासमोरील पार्किंगमध्ये उभी केली होती. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या संमतीशिवाय व अप्रामाणिक हेतूने दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी आरोपीविरोधात चिखली पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ६) भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 तडीपार आदेशाचा भंग करून कोयता बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
तडीपार आदेशाचा भंग करून शहरात प्रवेश करत धारदार कोयता बाळगणाऱ्या २८ वर्षीय तरुणावर संत तुकारामनगर पोलिसांनी गुरुवारी (ता. ६) कारवाई केली. हा तरुण रात्री सुमारे १० वाजता हिंदुस्तान अॅन्टिबायोटिक्स कंपनीच्या मोकळ्या मैदानात कोयत्यासह आढळला. पोलिसांनी त्याच्याजवळील लोखंडी धारदार कोयता जप्त केला आहे.
याबाबत पोलिस शिपाई सुनील ज्ञानोबा धावारे (वय ४०, संत तुकारामनगर पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव शाहरुख नईम शेख (वय २८, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे आहे. आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे परिमंडळ-१ चे तत्कालीन पोलिस उपायुक्तांच्या आदेशानुसार ११ नोव्हेंबर २०२४ पासून दोन वर्षांसाठी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतून तडीपार केले होते. तडीपार असतानाही कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता आरोपीने शहरात प्रवेश केला. तसेच पोलिस सहआयुक्तांच्या घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई आदेशाचा भंग करून आरोपीने धारदार लोखंडी कोयता बाळगला होता.
या प्रकरणी आरोपी तरुणावर संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------