दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांसाठी आता रुपये १० लाखांपर्यंत विमा संरक्षण
पिंपरी, ७ ऑगस्ट २०२६ - दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांसाठी आता रुपये १० लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व तसेच रुग्णालयीन खर्चासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी (ता. ६) जारी करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार, सन २०२६ मध्ये दहीहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील १,६०,००० गोविंदांना खालीलप्रमाणे विमा संरक्षण देण्यास मान्यता देण्यात येत आहे. गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास रुपये .१०,००,०००/-, दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास रुपये १०,००,०००/-, एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास रु. ५,००,०००/-, कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व आल्यास रु.१०,००,०००/-, कायम अपूर्ण/पक्षपाती अपंगत्व विमा पॉलिसी मध्ये नमूद केलेल्या टक्केवारीनुसार मदत, अपघातामुळे रुग्णालयीन खर्चामध्ये प्रत्यक्षात झालेला खर्च किंवा जास्तीत जास्त रुपये १,००,०००/- मदत केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य गोविंदा असोसिएशनने दहीहंडी उत्सवासाठी सराव व प्रशिक्षण असणाऱ्या, वयाची अट पूर्ण करणाऱ्या व प्रत्यक्षात भाग घेणाऱ्या गोविंदांची नोंदणी करून माहिती तपासून व प्रमाणित करून आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांना सादर करावी. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांनी नोंदणी झालेल्या गोविंदांच्या संख्येनुसार विमा हप्त्याची रक्कम/निधी अदा करावा. यावर होणारा खर्च राज्य क्रीडा विकास निधीतून भागविण्यात येईल, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.
