ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक - नगरसेवक शत्रुघ्न काटे
Apr 30 2026
48
ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक - नगरसेवक शत्रुघ्न काटे
वाकड येथील कस्पटेवस्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या १२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन
पिंपरी, ता. ३० - "ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा आधारस्तंभ व मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विविध अनुभवांमधून आजची तरुण पिढी घडणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी नेहमी तत्पर राहू.'' असा शब्द भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ज्येष्ठ नागरीकांना दिला.
वाकड येथील कस्पटेवस्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या १२ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काटे यांच्यासह महापौर रवी लांडगे, नगरसेवक राहुल कलाटे, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती वृषालीताई मरळ, कस्पटे वस्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुणजी कस्पटे प्रमुख अतिथी होते. यावेळी संघाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'संघ स्मरणिका' या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांचे 'सावरकरांचे हिंदुत्व' या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान झाले. कार्यक्रमात वय ७५ वर्षांवरील ज्येष्ठ सभासदांचा गौरव करण्यात आला.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात कस्पटेवस्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचे कौतुक केले. ज्येष्ठ नागरिकांनी संघटित होऊन राबवलेले उपक्रम वाखाणण्याजोगे आहेत. समाजातील प्रत्येक घटकाने ज्येष्ठांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. संघाने काढलेली ही स्मरणिका शहरातील सर्व ज्येष्ठ नागरीकांना सक्रीय राहण्याची प्रेरणा देणारी आहे, असे मान्यवर म्हणाले. नगरसेवक संदीप कस्पटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.