सोमाटणे येथे महिलेची पर्स चोरी; ९० हजारांचे दागिने, रोकड व मोबाईल लंपास
पिंपरी ता .२७ : नाश्त्यासाठी राजधानी स्वीटमध्ये आलेल्या महिलेची दुकानात विसरलेली पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना सोमाटणे येथे घडली. या पर्समध्ये सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोकड तसेच मोबाईल फोन होता.
ही घटना २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित महिला नाश्ता करण्यासाठी राजधानी स्वीटमध्ये आल्या होत्या. नाश्ता केल्यानंतर त्या आपली पर्स दुकानातच विसरून निघून गेल्या. काही वेळाने पर्स दुकानात राहिल्याचे लक्षात आल्यानंतर त्या पुन्हा दुकानात आल्या. मात्र, त्यावेळी पर्स जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
महिलेने आजूबाजूला चौकशी केली असता अज्ञात व्यक्तीने पर्स चोरल्याचे लक्षात आले. पर्समध्ये सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईल असा एकूण सुमारे ९० हजार रुपयांचा ऐवज होता.
याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलिसांकडून तपास सुरू आहे.