डांगे चौक-थेरगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, जुगार खेळवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ९ - वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव येथील डांगे चौक परिसरात सार्वजनिक शौचालयासमोरील फुटपाथवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी (ता. ८) पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळवणाऱ्या ३२ वर्षीय महिलेवर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत, पोलिस शिपाई रवि प्रकाश पवार (नेमणूक - गुन्हे शाखा युनिट-२, पिंपरी चिंचवड) यांनी फिर्याद दिली. आरोपी सखुबाई दशरथ शिंदे (वय ३२, सध्या रा. बालाजीनगर, भोसरी) ही महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चिमणी पाखरु नावाचा जुगार खेळ चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण १,०७०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी महिलेविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला भारतीय न्याय सुरक्षा संहिता कलम ३५(१)(३) अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.