महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांच्या घरांना मिळकतकरामध्ये ५० टक्के सवलत मिळणार
Apr 25 2026
41
महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांच्या घरांना मिळकतकरामध्ये ५० टक्के सवलत मिळणार
पुणे, ता. २५ - महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांच्या घरांना मिळकतकरामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा त्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला. स्थायी समितीच्या गुरुवारी (ता. २३) झालेल्या बैठकीमध्ये या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.
शहरात फक्त महिलांच्या नावावर नोंद असलेल्या ५०० चौरस फुटापर्यंतच्या मिळकतींची संख्या ७० हजार ७७३ इतकी आहे. या मिळकतींच्या मिळकत करामधून महापालिकेस सुमारे ४० कोटी ४८ लाख रुपये इतके उत्पन्न मिळते. मात्र, महापालिका प्रशासनाने प्रस्तावित ५० टक्के सवलतीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात अंदाजे २० कोटी रुपयांची घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याबाबत मुख्य विधी अधिकाऱ्यांचा अभिप्राय मागविण्यात आला होता. या अभिप्रायानुसार स्थायी समितीमध्ये ५० टक्के सवलतीस मान्यता देण्यात आली आहे. आता संबंधित प्रस्ताव मुख्य सभेपुढे सादर केला जाणार आहे. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.
सदर सवलत ही केवळ २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच लागू असणार, ३१ मार्च २०२५ रोजीपर्यंत मिळकत नावावर असणाऱ्याच महिला लाभार्थी ठरणार आहेत, १ एप्रिल २०२६ पूर्वीची थकबाकी, त्यावरील व्याज, दंड व शास्तीवर सवलत लागू नाही.
महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनात भिमाले म्हणाले की, ''महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना ज्या महिलांच्या नावावर मिळकत आहे, त्यांना मिळकतकरामध्ये ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्याबाबतच्या प्रस्तावास आज स्थायी समितीमध्ये मान्यता दिली आहे.''