येरवडा मेट्रो स्टेशन येथे 'शेअर्ड फीडर ऑटो सेवेचा' प्रारंभ
पुणे, ता. १० -पुणे मेट्रोने मेट्रो प्रवाशांना मेट्रो स्थानकावरुन इच्छितस्थळी जाण्यासाठी उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीसोबत नुकताच 'ऑटो फीडर' सेवेबाबत करार केला. महामेट्रो व महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा मेट्रो स्टेशन येथे 'शेअर्ड फीडर ऑटो सेवेचा' प्रारंभ करण्यात आला.
या उपक्रमाचे उद्घाटन महामेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे प्रवाशांना पुणे मेट्रोच्या स्थानकांपर्यंत पोहोचणे तसेच स्थानकांपासून इच्छित स्थळी जाणे अधिक सुलभ, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. यावेळी, रिक्षाचालकांनी 'शेअर्ड फीडर ऑटो सेवेत' सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त केला. या सेवेत सहभागी होऊन रिक्षाचालक प्रवाशांना नेहमीच चांगली सेवा देतील, असे रिक्षाचालकांनी सांगितले.
यावेळी महाव्यवस्थापक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील (एमएमआय/एचआर), महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे प्रमुख बाबा कांबळे व पदादिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पुणे मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.