तळेगावमधील शॅफ्लर इंडिया कंपनीतील दुर्घटनेत मरण पावलेल्या कामगारांना आर्थिक मदत द्यावी - काशिनाथ नखाते
तळेगावमधील शॅफ्लर इंडिया कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांना आर्थिक मदत द्यावी - काशिनाथ नखाते
पिंपरी, ता. १० - तळेगाव एमआयडीसीतील येथील नवलाख उंबरे परिसरातील शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड (CO_2) गॅस गळती होऊन दोन कामगार जागीच मरण पावले. या मृत कामगारांच्या कुटुंबीयांना तातडीने 10 लाखांची आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी मिळायला हवी, अशी मागणी कष्टकरी कामगार महासंघाचे प्रमुख काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
नखाते यांनी या दुर्घटनेतील मृत कामागारांना श्रद्धांजली अपर्ण केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शॅफ्लर इंडिया कंपनीमध्ये गॅस गळती होऊन वैभव थोरात आणि गौरीशंकर शर्मा या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू होणे ही अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना आहे. कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजीपणाला कोणतीही माफी असू शकत नाही.
या घटनेचा तपास करताना औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले का? आवश्यक सुरक्षा उपकरणे उपलब्ध होती का? या सर्व बाबींची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना तातडीने 10 लाखांची आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी मिळायला हवी, कामगारांचा जीव स्वस्त नाही, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असे नखाते यांनी म्हटले आहे.