मोबाईल खरेदीचे पैसे दिल्याचे भासवून दुकानदाराची फसवणूक
पिंपरी, ता. २० - खरेदी केलेल्या मोबाईलची रक्कम न देता एका युवकाने दुकानदाराची फसवणूक केली आहे. हा प्रकार १६ जूनला मावळ तालुक्यातील मौजे वराळे गावच्या हद्दीत विजय सेलवन मोबाईल शॉपीमध्ये घडला आहे.
याबाबत, दुकानाचे मालक सुरेश गोपाळे (वय ४१ वर्षे, व्यवसाय - मोबाईल शॉपी रा. वराळे) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपीवर तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता २०२३ कलम ३१६ (२), ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ जूनला एक अनोळखी युवक (वय अंदाजे २२ ते २४ वर्षे) गोपाळे यांच्या दुकानात आला. त्याने आयफोन १७ प्रो मोबाईल खरेदी करण्याचा बहाणा करून मोबाईल खरेदीची रक्कम रूपये १,३५,०००/- त्याच्या मोबाईल अॅप वरून पाठवितो असे दुकानदारास सांगितले. गोपाळे यांच्या बँक अकाउंन्ट वर १,५०,०००/- रूपये पाठवल्याचा स्क्रिनशॉट त्यांना दाखवला व त्यांच्या मोबाईलवर स्क्रिन शॉटचा फोटोही पाठवून मोबाईलचे पैसे पाठवल्याचे भासवले.
मात्र, प्रत्यक्षात मोबाईल खरेदीची रक्कम त्या युवकाने पाठवलीच नाही हे लक्षात आल्याने दुकानमालकाने पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी अनोळखी युवकावर गुन्हा दाखल केला आहे.