कालिदास सन्मान पुरस्कार २०२६ जाहीर

कालिदास सन्मान पुरस्कार २०२६ जाहीर

पिंपरी | २४ ऑक्टोबर २०२६ : भारतात महाकवी कालिदासांचे सर्वमान्य शिल्प अद्याप नसून, कालिदासांचे शिल्प अधिकृत व्हावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते कालिदास स्मृतिचिन्हाचे अनावरण करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर महाकवी कालिदास कला निकेतन संस्थेतर्फे ‘कालिदास सन्मान पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमाला शिल्पकार संजय खिलारे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद वाकडे आणि विश्वस्त अश्विनी सातव उपस्थित होते. यावेळी पुणे कालिदास महोत्सव आणि आगामी पुरस्कार वितरण सोहळ्याची माहिती शरद पवार यांना देण्यात आल्याचे गोविंद वाकडे यांनी सांगितले.

महाकवी कालिदास कला निकेतन संस्थेतर्फे जुलै २०२६ पासून ‘पुणे कालिदास महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. सहा महिने चालणाऱ्या या महोत्सवात कालिदासांच्या साहित्यकृतींवर आधारित नाट्यप्रयोग सादर करण्यात येत आहेत. आतापर्यंत ‘मेघदूत’, ‘ऋतुसंहार’ आणि ‘आषाढाचा पहिला दिवस’ हे प्रयोग सादर झाले आहेत. आगामी काळात ‘शाकुंतल’, ‘विक्रम उर्वशी’, ‘मालविक-अग्निमित्र’, ‘कुमारसंभव’ आणि तीन भागांतील ‘रघुवंश’ महानाट्य सादर करण्यात येणार आहे.

या महोत्सवानिमित्त साहित्य आणि रंगभूमी क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी संस्थेने यंदापासून ‘कालिदास सन्मान पुरस्कार’ सुरू केले आहेत.

पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सदाशिव पेठ, टिळक रोड येथील माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.

या सोहळ्यात पद्मश्री गिरीश प्रभुणे, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, अभिनेत्री चिन्मयी सुमित, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, हभप चैतन्य महाराज लोंढे आणि उद्योजक महेश भालेराव उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.

कालिदास नाट्य गौरव सन्मानासाठी मधू जोशी, चं. प्र. देशपांडे, प्रा. दिलीप जगताप, दीपक रेगे, चेतन दळवी आणि रंगभूषाकार शरद सावंत यांची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक दिग्दर्शक पुरस्कारासाठी भालचंद्र कुबल आणि अभिजित पानसे, तर सर्वोत्कृष्ट सृजनशील दिग्दर्शक पुरस्कारासाठी स्वागत थोरात यांची निवड झाली आहे.

याशिवाय युवा अभिनेता विभागात प्रितेश मांजलकर आणि मनोज डाळिंबकर, सर्वोत्कृष्ट कालिदास नाट्य अभिनेत्री म्हणून पर्ण पेठे, लक्षवेधी युवा अभिनेत्री म्हणून अश्विनी कासार, सोनाली मगर आणि अमृता ओंबळे यांचा गौरव करण्यात येणार आहे. नाट्य वेशभूषेसाठी चैत्राली डोंगरे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

कालिदास साहित्य गौरव सन्मानांतर्गत ‘गुरु’ कादंबरीसाठी नितीन कोतापल्ले, ‘माऊली ढाबा’साठी अविनाश गायकवाड, ‘कोरिओग्राफर’ कथासंग्रहासाठी सतीश तांबे, ‘खेळ’ नियतकालिकाच्या संपादनासाठी मंगेश नारायणराव काळे, ‘सीमांच्या पलीकडचे’ अनुवादासाठी नेहा भांडारकर, ‘धरणाच्या तळाशी’ कवितेसाठी सारिका आणि ‘चित्रक’साठी श्रीकांत ढेरंगे यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच कालिदास कला संवर्धक सन्मान महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, उद्योजक महेश भालेराव, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि हभप चैतन्य महाराज लोंढे (कबीर बुवा) यांना जाहीर करण्यात आला आहे.

साहित्य, नाट्य आणि कलाक्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती गोविंद वाकडे यांनी दिली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories