देहूरोड | २२ ऑक्टोबर २०२६ : देहूरोडमधील शितळानगर परिसरात घर खाली करण्याच्या वादातून एका ३६ वर्षीय तरुणाला कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला तीन टाके पडले असून, उजव्या हाताच्या मनगटाला आणि उजव्या पायाच्या नडगीला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात चार नामनिर्देशित आरोपींसह तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास देहूरोड येथील बरलोटानगर, शितळानगरमधील चंचला बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये घडली.
या प्रकरणी महादेव पुजारी (वय ३६ वर्षे,शितळानगर, मामुर्डी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी क्रमांक एकासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी आणि त्यांच्यासोबत आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला घर खाली करण्यास सांगितले. मात्र, फिर्यादीने घर खाली करण्यास नकार दिल्याने संबंधितांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
या वेळी गणेश मल्लेश गौफ रेड्डी याने फिर्यादीवर कोयत्याने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला दुखापत होऊन तीन टाके पडले. तसेच उजव्या हाताच्या मनगटावर आणि उजव्या पायाच्या नडगीवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी ससय्या जगदीश सय्या (वय ५० वर्षे), गणेश मल्लेश गौफ रेड्डी (वय २४ वर्षे), दीपक मल्लेश गौफ रेड्डी (वय ३० वर्षे) आणि गणेश ससय्या सय्या (वय २४ वर्षे, रा. देहूरोड) तसेच तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(२), ११५(२), ३(५), भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.