शिरगाव | २३ ऑक्टोबर २०२६ : शेअर ट्रेडिंग आणि फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दररोज आकर्षक नफा आणि महिन्याला हमखास परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांची कोट्यवधींची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महाट्रेड आणि ट्रेडवे या नावाने चालविण्यात येणाऱ्या गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून हा प्रकार घडल्याचा आरोप असून, संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जुलै २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडला. या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे.
या गुन्ह्यात सुहास जालिंदर रायकर (रा. पिंपळगाव, अहिल्यानगर) आणि देविदास जालिंदर रायकर (रा. कसबेवस्ती, आव्हाडी, अहिल्यानगर) यांच्यासह महाट्रेड, ट्रेडवे या संस्थांचे प्राधिकारी, प्रवर्तक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, संबंधित व्यक्तींनी संगनमत करून महाट्रेड (mahatrade.in) आणि ट्रेडवे या नावांची दोन गुंतवणूक ॲप्लिकेशन्स उपलब्ध करून दिली होती. ही ॲप्लिकेशन्स कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आणि अल्गोरिदमच्या आधारे शेअर व फॉरेक्स ट्रेडिंग करत असल्याचे गुंतवणूकदारांना सांगण्यात आले.
या गुंतवणुकीवर दररोज किमान ०.७० टक्के नफा आणि महिन्याला १५ टक्के हमखास परतावा मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने सुरुवातीला महाट्रेडमध्ये ३२ लाख ३८ हजार रुपये, तर त्यानंतर ट्रेडवे कंपनीमध्ये ५४ लाख ८८ हजार रुपये अशी एकूण ८७ लाख २६ हजार रुपयांची गुंतवणूक केली.
गुंतवणुकीनंतर संबंधित ॲप्लिकेशन्सवर शेअर ट्रेडिंग सुरू असल्याचे आणि त्यातून नफा मिळत असल्याचे दाखविण्यात येत होते. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, या माध्यमातून तिला ११ लाख ३९ हजार ५१४ रुपये नफ्याच्या स्वरूपात परत देण्यात आले.
मात्र, प्रत्यक्षात गुंतवणूक केलेल्या रकमेतून कोणतेही शेअर ट्रेडिंग न करता आरोपींनी परस्पर पैसे हस्तांतरित करून त्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यामुळे फिर्यादीची ६७ लाख ८६ हजार ४८६ रुपयांच्या मूळ मुद्दल आणि आश्वासित परताव्याच्या रकमेची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच फिर्यादीचे वडील, चंद्रकांत, आई आणि बहीण यांच्याकडूनही ५ कोटी १ लाख ८७ हजार ६८४ रुपये स्वीकारण्यात आले होते. त्यापैकी १ कोटी ५२ लाख २६ हजार १६५ रुपये परत करण्यात आले असून, उर्वरित ३ कोटी ४९ लाख ६१ हजार ५१९ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहेत.