वायसीएम रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा

वायसीएम रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा

पिंपरी | २४ ऑक्टोबर २०२६ : पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून त्याचा गळा दाबण्यात आला. तसेच लोखंडी कड्याने चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. ही घटना शनिवारी (२४ ऑक्टोबर) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जण त्यांच्या मित्राला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात घेऊन आले होते. यावेळी संबंधितांनी रुग्णालयात गोंधळ घालत डॉक्टरांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे.

रुग्णालयात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधितांनी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. त्यानंतर त्याचा गळा दाबून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच एका आरोपीने रुग्णालयातील पोलीस चौकीत जाऊन लोखंडी कड्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या कपाळावर वार केला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्याला जिवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी वैभव सुभाष साळुंखे, कुशाल नैना गोयल आणि सोहेल शब्बीर शेख या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि जिवे मारण्याची धमकी देणे या आरोपांप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

या घटनेप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, संत तुकारामनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories