पिंपरी | २१ ऑक्टोबर २०२६ : पिंपरीतील जर्मन बेकरीजवळ दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून वडील आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत मुलाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, २२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांच्या सुमारास पिंपरी येथील वास्तू उद्योग परिसरातील जर्मन बेकरीजवळ घडली.
या प्रकरणी शाहरुख इस्माईल शेख (वय ४२ वर्षे,मासुळकर कॉलनी, अजमेरा, पिंपरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी शाहरुख शेख आणि त्यांचा १५ वर्षीय मुलगा हे त्यांच्या मालकीच्या दुचाकीवरून पिण्याचे पाणी आणण्यासाठी गांधीनगर, पिंपरी येथे गेले होते. पाणी घेऊन ते आपल्या राहत्या घरी परतत असताना जर्मन बेकरीजवळ त्यांचा आरोपीशी वाद झाला.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने त्याची दुचाकी फिर्यादीच्या दुचाकीच्या अगदी जवळ आणली. त्यामुळे फिर्यादीने दुचाकीला जोरात कट मारल्याबद्दल आरोपीला जाब विचारला.
याच कारणावरून आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादीला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांचा १५ वर्षीय मुलगा त्यांना वाचवण्यासाठी मध्ये आला. त्यावेळी आरोपीने मुलाला पकडून हाताने मारहाण केली. तसेच मुलाच्या नाकावर जोरात बुक्की मारल्याने त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी आदेश दिलीप शिर्के (वय २२ वर्षे, पुनर्नगर, चिंचवड, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११७(२), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संत तुकारामनगर पोलीस करत आहेत.