राष्ट्रीय एकता बाईक रॅलीचे पिंपरी-चिंचवडमध्ये स्वागत; नशामुक्त भारताचा संदेश

राष्ट्रीय एकता बाईक रॅलीचे पिंपरी-चिंचवडमध्ये स्वागत; नशामुक्त भारताचा संदेश

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब : राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता आणि अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा संदेश देत दक्षिण भारतातून सुरू झालेल्या राष्ट्रीय एकता बाईक रॅलीचे पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. रावेत येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या परिसरात ढोल-ताशांचा गजर आणि पुष्पवृष्टी करत विविध राज्यांतून आलेल्या बाईक रायडर्सचा सन्मान करण्यात आला.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि नशामुक्त भारताचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

रॅलीचे महाविद्यालयाच्या परिसरात आगमन होताच उपस्थितांनी रायडर्सचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या हस्ते विविध राज्यांतून आलेल्या रायडर्सना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या रॅलीमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सुमारे १०० बाईक रायडर्सनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाला पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-१) संदीप आटोळे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२) प्रदीप जाधव, पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम उपस्थित होते. तसेच अंमली पदार्थविरोधी पथकातील अधिकारी, पोलीस अंमलदार, बाईक रायडर्स आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

दक्षिण भारतातून सुरू झालेली ही रॅली देशाच्या विविध भागांतून प्रवास करत असून, ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडिया येथील एकतानगरमध्ये पोहोचणार आहे. या प्रवासादरम्यान राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासोबतच तरुणांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूक केले जात आहे.

रावेतमधील स्वागत समारंभानंतर पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला पुढील प्रवासासाठी रवाना केले. यावेळी उपस्थितांनी रायडर्सना शुभेच्छा दिल्या.

‘अंमली पदार्थांना नाही, जीवनाला हो!’ हा संदेश देत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे आवाहन केले. ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या या स्वागतामुळे रावेत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories