मुलांच्या भांडणातून मायलेकाला मारहाण; दोन जणांवर गुन्हा

मुलांच्या भांडणातून मायलेकाला मारहाण; दोन जणांवर गुन्हा

चऱ्होली बुद्रुक | २२ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील चऱ्होली बुद्रुक येथील काळजेवाडी परिसरात मुलांच्या भांडणातून एका महिलेला आणि तिच्या मुलाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मुलाला झालेल्या मारहाणीबाबत समज देण्यासाठी गेलेल्या आईसमोरच तिच्या मुलाला पुन्हा मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा मित्र देवांग पठारे, एक महिला आरोपी आणि अन्य काही मुलांनी फिर्यादीच्या सार्थक नावाच्या मुलाला हाताबुक्क्यांनी मारहाण केली होती. याबाबत संबंधितांना समज देण्यासाठी फिर्यादी महिला, तिचा मुलगा आणि सासू असे तिघे २२ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तनिष ओ २ सोसायटीच्या गेटवर, काळजेवाडी, चऱ्होली बुद्रुक येथे गेले होते.

त्यावेळी महिला आरोपीने हाताने मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर अचानक लपवून ठेवलेल्या धारदार शस्त्राने फिर्यादीच्या मुलावर वार करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मुलाच्या उजव्या तळहातावर, डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ आणि उजव्या खांद्याजवळ गंभीर जखमा झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तसेच संबंधित महिला आरोपी आणि तिची आई संतोषी काळजे यांनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात एका महिला आरोपीसह केतन जीवन काळजे (रा. बी विंग, फ्लॅट क्रमांक ३०८, तनिष ओ २ सोसायटी, काळजेवाडी, चऱ्होली बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ३५१(२), ३५२ तसेच भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories