आळंदी | २१ ऑक्टोबर २०२६ : आळंदीजवळील चऱ्होली खुर्द परिसरात अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर जखमीला मदत न करता वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मौजे चऱ्होली खुर्द गावाच्या हद्दीत, प्लुमेरिया मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर घडली.
या प्रकरणी किरण भागवत पांढरे (वय ४० वर्षे, राहणार पद्मावती रोड, आळंदी, तालुका खेड, जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, त्यांचे चुलत भाऊ अंकुश जनार्दन पांढरे (वय ४४ वर्षे) हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक MH 14 GL 0805 वरून पीसीएस चौकाकडून दशमाडे सरकार चौकाच्या दिशेने जात होते.
त्यावेळी प्लुमेरिया मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर एका अज्ञात वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात, निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे चालवत दुचाकीला पाठीमागून धडक दिली.
या अपघातात अंकुश पांढरे रस्त्यावर खाली पडले. त्यांच्या उजव्या बाजूच्या हाताला, डोक्याला, कानाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने जखमीला मदत केली नाही. तसेच अपघाताची माहिती न देता तो घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०६, २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.