बनावट इन्स्टाग्राम प्रोफाइलद्वारे ५० हजारांची खंडणी; आरोपी अटकेत

बनावट इन्स्टाग्राम प्रोफाइलद्वारे ५० हजारांची खंडणी; आरोपी अटकेत

पिंपरी-चिंचवड | २२ ऑक्टोबर २०२६ : इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून तरुणाला त्याचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने एका ३५ वर्षीय आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून १ लाख ४ हजार १३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने खंडणीविरोधी पथकाच्या मोरवाडी येथील कार्यालयात येऊन तक्रार दिली होती. फिर्यादीला इन्स्टाग्रामवरील 'RuchitaNikam93' या नावाच्या बनावट मुलीच्या प्रोफाइलवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली होती. फिर्यादीने ती स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्याला स्वतःचे खासगी फोटो पाठवण्यास सांगितले. फिर्यादीने विश्वास ठेवून फोटो पाठवले.

त्यानंतर अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून फिर्यादीचे फोटो त्याच्याकडे असल्याचे सांगितले. हे फोटो फिर्यादी काम करत असलेल्या कार्यालयातील मोबाईलवर तसेच पार्टटाइम कामाच्या ठिकाणी पाठवण्याची धमकी देण्यात आली. फोटो पाठवू नयेत यासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने सांगितले.

तसेच फिर्यादीच्या मैत्रिणीच्या मोबाईलवरही धमकीचा संदेश पाठवण्यात आला. पैसे न दिल्यास तिच्या मित्राला मारहाण करण्याची धमकी देण्यात आली. याशिवाय 'Bhalchandra Aher' या फेसबुक खात्यावरूनही फिर्यादीला धमकीचे संदेश आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०८(३), ३५१(२) आणि ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करताना खंडणीविरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हनुमान सुभाष खरात (वय ३५ वर्षे वासोली, ता. खेड, जि. पुणे; मूळ जि. बुलढाणा) याला अटक केली.

आरोपीकडून एक मोटारसायकल, एक मोबाईल, एक पाकीट, आधारकार्ड आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ४ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी अशाच प्रकारचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने केली.

दरम्यान, कोणाकडूनही खंडणीची मागणी होत असल्यास किंवा कोणी खंडणीसाठी त्रास देत असल्यास नागरिकांनी खंडणीविरोधी पथक, गुन्हे शाखा किंवा संत तुकारामनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories