चाकणमध्ये दोन तरुणांना अटक; ५० हजारांची बेकायदा पिस्तूल जप्त

चाकणमध्ये दोन तरुणांना अटक; ५० हजारांची बेकायदा पिस्तूल जप्त

चाकण | २२ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणीविरोधी पथकाने चाकण परिसरात कारवाई करत दोन तरुणांना अटक करून ५० हजार रुपये किमतीची एक बेकायदा पिस्तूल जप्त केली आहे. आरोपींकडे अवैध शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने ही कारवाई केली. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाचे पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव, निलेश जाधव आणि संदीप गंगावणे यांना आरोपींकडे अवैध शस्त्र असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.४० वाजण्याच्या सुमारास माऊली पार्कच्या कमानीजवळ, नाणेकरवाडी, एमआयडीसी रोड, तालुका खेड येथे सापळा रचला.

या कारवाईत यश अनिल शिंदे (वय २२ वर्षे, मूळ राहणार अवसरी खुर्द, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे) आणि प्रज्वल सुधीर जाधव (वय २२ वर्षे, मूळ राहणार जाधववाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, यश शिंदे याच्या ताब्यातून ५० हजार रुपये किमतीची एक पिस्तूल जप्त करण्यात आली. पिस्तुलाबाबत विचारपूस केली असता ती प्रज्वल जाधव याने दिल्याचे यशने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

त्यानंतर प्रज्वल जाधव याच्याकडे चौकशी केली असता संबंधित पिस्तूल त्याला फारुख अन्वर पठाण (वय २५ वर्षे, राहणार बालाजीनगर, चाकण) याने दिल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५), भारतीय हत्यार कायद्याचे कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी दक्षिण चाकण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories