मोशी | २१ ऑक्टोबर २०२६ : मोशीतील शिवाजीवाडी परिसरात देवी मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून तीन तरुणांमध्ये झोंबाझोंबी, मारहाण आणि शिवीगाळ झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० .३० वाजण्याच्या सुमारास शिवाजीवाडी, मोशी येथील सिल्वर करिश्मा सोसायटीसमोरील रस्त्यावर घडली.
या प्रकरणी केदार शिवाजी जाधव (वय २७ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. ते भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये वैभव विश्वंभर अंगीवार (वय २३ वर्षे, राहणार शिवाजीवाडी, मोशी), यश सुदाम उल्लारे (वय १९ वर्षे, राहणार शिवाजीवाडी, मोशी) आणि रत्नदीप रावसाहेब वाघमारे (वय २२ वर्षे, राहणार कुरुळी गाव, तालुका खेड, जिल्हा पुणे) यांचा समावेश आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, मिरवणुकीपासून सुमारे ५० मीटर अंतरावर सिल्वर करिश्मा सोसायटीसमोरील रस्त्यावर तिन्ही तरुण एकमेकांशी झोंबाझोंबी करत होते. त्यांच्यात हाताने मारहाण आणि शिवीगाळ सुरू होती. त्यामुळे त्या ठिकाणी सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १९४(२) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.