आमदार अमित गोरखेंचा पहिला जनता दरबार ; नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाहीचे निर्देश

आमदार अमित गोरखेंचा पहिला जनता दरबार ; नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाहीचे निर्देश

पिंपरी-चिंचवड | २८ नोव्हेंबर २०२६ : नागरिकांच्या दैनंदिन समस्या जाणून घेऊन त्यांच्या निराकरणासाठी प्रशासनाशी थेट समन्वय साधण्याच्या उद्देशाने विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पहिल्या जनता दरबाराचे आयोजन केले होते. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी विधानसभा मतदारसंघासह शहरातील हजारो नागरिकांनी या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

भाजपच्या शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्ष कार्यालय केवळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपुरते मर्यादित न ठेवता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. नागरिकांना आपल्या अडचणी थेट पक्ष कार्यालयात येऊन मांडता याव्यात, या संकल्पनेतून आमदार गोरखे यांनी जनता दरबार सुरू केला आहे.

जनता दरबारात नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, सांडपाणी निचरा व्यवस्था, वीज, आरोग्य, शिक्षण, महापालिकेतील प्रलंबित कामे आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांशी संबंधित अडचणी मांडल्या.

आमदार गोरखे यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तातडीने सोडविणे शक्य असलेल्या प्रश्नांवर जागेवरच कार्यवाही करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. उर्वरित प्रश्नांचा नियमित पाठपुरावा करून ते निर्धारित कालावधीत मार्गी लावण्याची ग्वाही गोरखे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणाच्या विचारांतून प्रेरणा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या योजना आणि सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आमदार गोरखे यांनी सांगितले.

ते म्हणाले, “सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न हा आमच्यासाठी केवळ एक अर्ज किंवा निवेदन नसून त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वाचा विषय आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विचारानुसार भाजपा मध्यवर्ती पक्ष कार्यालयात पहिल्या जनता दरबाराचे आयोजन केले. नागरिकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करणे ही आमची जबाबदारी आहे.”

यापुढेही जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे गोरखे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories