पिंपरी | २८ नोव्हेंबर २०२६ :चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने चार महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या ई-निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. आमदार शंकर जगताप यांनी या प्रकल्पांना प्राधान्य दिले असून, प्रस्तावित कामांमुळे वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड आणि थेरगाव परिसरातील वाहनचालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत या चारही कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रमुख चौकांमधील वाहतुकीचा वाढता ताण कमी करणे, सिग्नलवरील प्रतीक्षा वेळ कमी करणे आणि दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करणे, हा या प्रकल्पांचा उद्देश आहे.
- वाकड ते नाशिक फाटा रस्त्यावरील कल्पतरू चौकात सबवे उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे पिंपळे गुरव परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
- चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून त्याठिकाणी नवीन रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) उभारण्यात येणार आहे. या कामासाठीही महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली आहे.
- पिंपळे सौदागर येथील पी. के. चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा चौक सिग्नलमुक्त करण्याच्या उपाययोजना प्रस्तावित आहेत. या प्रकल्पामुळे गर्दीच्या वेळेत सिग्नलवर थांबण्याचा कालावधी कमी होण्यास मदत होईल.
- डांगे चौकातील विद्यमान ग्रेड सेपरेटरची थेरगाव फाट्याच्या दिशेने लांबी वाढविण्यात येणार आहे. या विस्तारीकरणामुळे डांगे चौक आणि थेरगाव परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
या चारही प्रकल्पांच्या माध्यमातून प्रमुख वाहतूक मार्गांवरील अडथळे कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्यासह वेळ आणि इंधनाची बचत होण्याची अपेक्षा आहे. निविदा प्रसिद्ध झाल्याने प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
“चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड आणि थेरगाव या भागांतील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन चार महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचावा, वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा आणि मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम व्हावी," हाच या कामांमागील मुख्य उद्देश असल्याचे आमदार शंकर जगतापांनी सांगितले.