पिंपरी | २८ नोव्हेंबर २०२६ : प्रबोधनपर गीते आणि सांस्कृतिक सादरीकरणातून पिंपरीतील भीमसृष्टी स्मारकात संविधानातील मूल्यांचा जागर करण्यात आला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमांना विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महापालिकेच्या विद्युत विभागाने भीमसृष्टी स्मारक परिसरात विद्युत रोषणाई केली होती, तर उद्यान विभागाने फुलांची सजावट केली होती. यावेळी भाग्यश्री इंगळे यांनी प्रबोधनपर गीते सादर केली. या गीतांतून सामाजिक समता आणि लोकशाही मूल्यांचा संदेश देण्यात आला.
मंजुषा शिंदे, राहुल शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘जागर संविधानाचा’ हा विशेष कार्यक्रम सादर केला. त्यातून भारतीय राज्यघटनेचा इतिहास, तिचे महत्त्व आणि राज्यघटनेच्या निर्मितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले योगदान उलगडण्यात आले. संतोष जोंधळे, आम्रपाली पगारे, संकल्प गोळे व त्यांचे सहकारी आणि अजय देहाडे यांनीही प्रबोधनपर गीते सादर केली.
महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे आणि कला, क्रीडा, सांस्कृतिक व पर्यटन समितीचे सभापती कैलास कुटे यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, आंबेडकरी अनुयायी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.