आषाढी पालखी सोहळ्यासाठी माऊलींच्या रथाला बैलजोडी लावण्याचा मान रानवडे कुटुंबातील तिघांना

आषाढी पालखी सोहळ्यासाठी माऊलींच्या रथाला बैलजोडी लावण्याचा मान रानवडे कुटुंबातील तिघांना

आषाढी पालखी सोहळ्यासाठी माऊलींच्या रथाला बैलजोडी लावण्याचा मान रानवडे कुटुंबातील तिघांना

पिंपरी, ता. ३० -  यंदाच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी सोहळ्यासाठी माउलींच्या रथाला बैलजोडी लावण्याचा बहुमान रानवडे घराण्यातील तीन जणांना देण्यात आला आहे. याबाबतचे अधिकृत पत्र  श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने निवड झालेल्या कुटंबांना दिले आहे. बैलजोडी निवड समितीने संस्थानला केलेल्या शिफारशीनुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा बैलजोडी निवडीबाबत मतभेद सुरु होते. यापूर्वी बैलजोडी निवड समितीने जाहीर केलेल्या मानकऱ्यांवर उमेश रानवडे यांनी आक्षेप घेत हा मान स्वतःच्या बैलांना मिळावा यासाठी उपोषण केले. त्यानंतरही तोडगा न निघाल्याने न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली. आळंदी देवस्थान समितीच्या मध्यस्थीने हा वाद मिटला आहे. रविवारी (दि. २८) रात्री देवस्थान, बैलनिवड समिती व रानवडे कुटुंबीयांची एकत्रित बैठक घेऊन हा तिढा सोडविण्यात आला. बैलजोडी निवड समितीने संस्थानला केलेल्या शिफारशीनुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

आळंदी देवस्थान  समितीने रानवडे कुटुंबियांतील तिघांनाही जिल्हावार बैलजोडी लावण्याचा मान विभागून दिला. वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन बैलजोड्या माऊलींचा रथ ओढणार आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर या तीनही जिल्ह्यांच्या प्रवासासाठी रानवडे घराण्यातील वेगवेगळ्या मानकऱ्यांच्या बैलजोडींची निवड करण्यात आली आहे.

 पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून जात असताना आणि परत येत असताना रथाला बैलजोडी लावण्याचा मान हर्षवर्धन प्रदीप रानवडे यांना देण्यात आला आहे. त्यानंतर, सातारा जिल्ह्यातील प्रवासादरम्यान, जाताना व परतीच्या प्रवासात उमेश लक्ष्मण रानवडे यांच्या बैलजोडीला हा मान लाभणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील मार्गक्रमणावेळी म्हणजेच जाताना व येताना तुळशीराम ज्ञानोबा रानवडे यांच्या बैलजोडीची रथासाठी निवड करण्यात आली आहे.

याबाबतचे अधिकृत पत्र देताना विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बैलजोड निवड समितीचे अध्यक्ष बबनराव कुन्हाडे, उपाध्यक्ष शिवाजीराव रानवडे, सदस्य नंदकुमार कुन्हाडे, विलास घुंडरे, रामचंद्र भोसले, ज्ञानोबा वहिले, रमेश कुऱ्हाडे, रानवडे कुटुंबीय उपस्थित होते.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांच्या स्वाक्षरीने हे अधिकृत पत्र मानकऱ्यांना सुपुर्द करण्यात आले आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories