बल्क वेस्ट जनरेटर्सच्या नोंदणीसाठी महापालिकेची मोहिम

बल्क वेस्ट जनरेटर्सच्या नोंदणीसाठी महापालिकेची मोहिम

बल्क वेस्ट जनरेटर्सच्या नोंदणीसाठी महापालिकेची मोहिम

घरोघरी भेट देणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन

पिंपरी, ता. १३ ऑगस्ट २०२६ - शहरातील घनकचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन, कचऱ्याचे योग्य विलगीकरण आणि पर्यावरण संवर्धनासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने बल्क वेस्ट जनरेटर्सच्या नोंदणीसह जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेचे कर्मचारी नागरिक आणि विविध आस्थापनांना भेट देऊन घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांची माहिती देत आहेत. घरोघरी भेट देणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

गृहसंकुले, हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, कार्यालये, व्यावसायिक आस्थापना तसेच मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या अन्य संस्थांनी कचऱ्याचे ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा अशा चार प्रकारांत योग्य विलगीकरण करणे आवश्यक आहे. ओल्या कचऱ्यावर संबंधित परिसरातच प्रक्रिया करून त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यावरही महापालिकेने भर दिला आहे.

बल्क वेस्ट जनरेटर्सनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी https://swm.cpcb.gov.in/register या संकेतस्थळाचा वापर करावा. नोंदणी प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी तसेच संबंधित आस्थापनांची माहिती संकलित करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी प्रत्यक्ष भेटी देत आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे म्हणाले, “शहरातील कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून प्रत्येक नागरिक आणि आस्थापनाची आहे. कचऱ्याचे योग्य विलगीकरण आणि त्यावर योग्य प्रक्रिया करण्याची सवय सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे. बल्क वेस्ट जनरेटर्सनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून नियमांचे पालन करावे. तसेच महापालिकेचे कर्मचारी माहिती संकलनासाठी भेट देत असताना त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे.”

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना त्याचे निर्माण होण्याच्या ठिकाणीच योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. बल्क वेस्ट जनरेटर्सनी कचरा विलगीकरण, प्रक्रिया आणि नोंदणी या तिन्ही बाबींना प्राधान्य द्यावे. महापालिकेच्या मोहिमेतून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे शहरातील घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे.”

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले, “घनकचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी प्रभावी करण्यासाठी बल्क वेस्ट जनरेटर्सची अचूक माहिती आणि त्यांची नोंदणी महत्त्वाची आहे. त्यामुळे संबंधित आस्थापनांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी. कचऱ्याचे विलगीकरण आणि ओल्या कचऱ्यावरील प्रक्रिया याबाबतही नियमांचे काटेकोर पालन करावे.”

उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “कचरा योग्य पद्धतीने हाताळला नाही तर त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणावर होतो. त्यामुळे प्रत्येक बल्क वेस्ट जनरेटरने आपल्या परिसरातील कचऱ्याचे योग्य विलगीकरण करून त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी आणि स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.”

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिक व आस्थापनांना भेट देताना घनकचरा व्यवस्थापन, कचरा विलगीकरण, ओल्या कचऱ्यावरील प्रक्रिया तसेच बल्क वेस्ट जनरेटर्सच्या नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे ओळखपत्र घालून माहिती संकलनासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य करून योग्य माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories