क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - १३ ऑगस्ट २०२६
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 मूल होत नाही म्हणून पत्नीच्या गळ्यावर केले चाकूने वार
'मूल होत नाही' या कारणावरून पत्नीशी वाद घालून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करुन तिला गंभीर जखमी केले. ही घटना कैलासनगर-थेरगाव येथे ११ ऑगस्टला सकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. या प्रकरणी पतीवर काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, काळेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल लहू कांबळे यांनी फिर्याद नोंदवली. आरोपी पतीचे नाव नितेश नंदकिशोर गायकवाड (वय ३५, रा. कैलासनगर, थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे.
११ ऑगस्टला घरामध्ये आरोपी पतीने पत्नीशी मूल होत नसल्याच्या कारणावरुन वाद घातला आणि तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने भाजी कापण्याच्या चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करुन तिला गंभीर जखमी केले आहे. जखमी पत्नीचे नाव चिन्मयी नितेश गायकवाड (वय २५) असे आहे. आरोपी पतीविरोधात काळेवाडी पोलिस ठाण्यात
बुधवारी (ता. १२) भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 पतीने पत्नीवर केले चाकूने वार, थेरगावमधील घटना
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा दाबून, चाकूने तिच्या कंबरेवर व बगलेवर वार करून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ११ ऑगस्टला वाकड येथे घडली. आई-वडिलांची भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या मुलीलाही चाकूचा वार लागला आहे. आरोपी पतीवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, तीस वर्षीय पत्नीने पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपी पतीचे नाव कृष्णाजी विश्वनाथ सोमवंशी (वय ३५ वर्षे, सेक्युरीटी गार्ड, रा. दत्तमंदीर रोड, वाकड)
असे आहे. दिनांक ११ ऑगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी पत्नी घरात स्वयंपाकघरात दूध गरम कर होती व कंबरदुखीच्या गोळ्या घेत होती. त्यावेळी आरोपी पतीने मागून येऊन त्यांना झोपण्यास चल, असे सांगितले. मात्र, पत्नीने पतीला 'मुले जागी आहेत, कंबर दुखत आहे, उद्या पाहू' असे सांगून नकार दिला. त्याचा राग आल्याने आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, शिवीगाळ करत पत्नीचा गळा दोन्ही हातांनी दाबला. त्यानंतर चाकूने पत्नीच्या कंबरेवर आणि उजव्या बगलेवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. हा प्रकार सुरू असताना मुलगी अंजली भांडण सोडविण्यासाठी आली. त्यावेळी तिच्याही उजव्या गुडघ्यावर व हातावर चाकूचा वार लागून ती जखमी झाली. या प्रकरणी आरोपीवर पतीवर बुधवारी (ता. १२) वाकड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९ (१) व ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला अटक, आळंदी देवाची येथील घटना
अवघ्या सहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. ही घटना आळंदी देवाची येथील इंद्रायणी नगर परिसरात जुलै २०२६ ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी तरुणाने मुलाला घरात बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास मारण्याची आणि पोलिसांत तक्रार केली तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी आरोपीविरोधात बुधवारी (ता. १२) दिघी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (२) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ मधील कलम ४, ६ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 तडीपार आदेशाचा भंग, वाकडमध्ये कोयत्यासह एकाला अटक
तडीपार आदेशाचा भंग करून वाकड परिसरात कोयता घेऊन फिरणाऱ्या हद्दपार आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी (१२ ऑगस्ट) रात्री सव्वाआठच्या सुमारास म्हातोबानगर झोपडपट्टी, दत्तमंदिर रोड येथील परफेक्ट बेकरीसमोर करण्यात आली.
या प्रकरणी पोलिस हवालदार सचिन दत्तात्रय गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. सुनिल ऊर्फ दाद्या मोहन शिंदे (वय ४०, सध्या रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर; मूळ रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, दत्तमंदिर रोड, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्तांनी ३ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशान्वये पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. असे असतानाही कोणतीही परवानगी न घेता तो वाकड परिसरात आल्याचे आढळून आले.
दरम्यान, ५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत शस्त्रे अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास मनाई असतानाही शिंदे हा कोयता बाळगून फिरताना पोलिसांना आढळला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 पेन्शन कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची ३ लाख ३० हजारांची ऑनलाइन फसवणूक
पेन्शन कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने एका ६१ वर्षीय निवृत्त इसमाला ओटीपी देण्यास भाग पाडून त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून तब्बल ३ लाख ३० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १२) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, संबंधित ज्येष्ठ नागरिक महादेव काळाराम रोकडे (वय ६१, रा. विजयराज कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची फसवणूक २१ ते २५ जुलैदरम्यान रोकडे यांच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडली.
अज्ञात आरोपीने रोकडे यांचा विश्वास संपादन करून ‘पेन्शन कार्ड काढून देतो,’ असे सांगितले. त्यानंतर त्यांना ओटीपी देण्यास भाग पाडले. ओटीपीचा गैरवापर करून आरोपीने रोकडे व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून आयएमपीएसच्या माध्यमातून एकूण ३ लाख ३० हजार रुपये काढून घेतले. आपली ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रोकडे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी आरोपीविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १२) भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) आणि भारतीय दंड विधान कलम ४२०, ४१९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाभार्थी बँक खातेधारकांचाही तपास करण्यात येत आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 फ्लॅट बुकिंग करायला लावून ग्राहकाची २३ लाखांची फसवणूक, विक्रीप्रमुखाविरुद्ध गुन्हा
एका कंपनीतील विक्रीप्रमुखाने कंपनीशी कोणताही करार केलेला नसता ग्राहकाला फ्लॅट बुक करायला लावला व ग्राहकाकडून २९ लाख ३३ हजार २०० रुपये घेत त्यापैकी २३ लाख ८ हजार रुपये स्वतःच्या वापरासाठी वळवले. ही फसवणुकीची घटना ३० एप्रिल २०२५ ते आत्तापर्यंत घडली आहे. या प्रकरणी त्या विक्रीप्रमुखाविरुद्ध बुधवारी (ता. १२) रावेत पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी ऋषीकेश शिवाजी आहेर (वय ३०, रा. पिंपळे निलख, मूळ रा. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. विक्रीप्रमुख आरोपीचे नाव सारंग भारत बोरा (वय अंदाजे ३७, रा. अहिल्यानगर) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बोरा हा पुनावळे येथील ‘१८ मॅग्निट्युड’ प्रकल्पात विस्टेरिया रिअल व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सेल्स हेड म्हणून कार्यरत होता. कंपनी आणि संबंधित डेव्हलपर यांच्यात सेल्स मॅनडेट एजंटबाबत कोणताही करार नसतानाही त्याने आहेर यांना प्रकल्पातील बी-१०५ क्रमांकाचा फ्लॅट बुक करण्यास सांगितले.
फ्लॅटच्या बुकिंगसाठी ३० एप्रिल २०२५ ते १३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आहेर यांच्याकडून रोख तसेच विविध बँक खात्यांद्वारे ऑनलाइन पद्धतीने एकूण २९ लाख ३३ हजार २०० रुपये घेण्यात आले. त्यापैकी केवळ ६ लाख २५ हजार २०० रुपये जी. डी. स्क्वेअर डेव्हलपर यांना देण्यात आले. उर्वरित २३ लाख ८ हजार रुपये आरोपीने स्वतःच्या वापरासाठी वळवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच, पैसे घेतल्यानंतरही फ्लॅटचे खरेदीखत करून न देता विश्वासघात व आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३१६(२) अन्वये, तसेच भादंवि कलम ४२० व ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 सोमाटणे येथे कोयते हवेत फिरवत दहशत; अल्पवयीन जखमी
सोमाटणे (ता. मावळ) येथे चायनिज सेंटरसमोर ताडीविक्री केंद्राच्या बाजूला तिघांनी तरुणाला मारहाण करून कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केल्याची घटना बुधवारी (ता. १२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. कोयत्याचा वार अडविताना १७ वर्षीय मुलाच्या दोन्ही हातांच्या बोटांना दुखापत झाली.
या प्रकरणी आदित्य अमर कोळी (वय १७, रा. शंकरवाडी क्र. २, सोमाटणे फाटा) याने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आकाश माने ऊर्फ बच्चा (वय २५), अनिल (वय २८) आणि प्रसाद (वय २५, तिघांचेही पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र शुभम राऊत हे सचिन चायनिज सेंटरसमोर उभे असताना आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीचा भाऊ शुभम कोळी याला हाताने मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी व त्याचा मित्र भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेले.
दरम्यान, आरोपींनी कमरेला लावलेले कोयते बाहेर काढून हवेत फिरवत दहशत निर्माण केली. त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरून तेथून पळून गेले. त्यानंतर आरोपींपैकी एकाने हातातील कोयता फिरविला. तो अडविण्याचा प्रयत्न करताना कोयता आदित्यच्या दोन्ही हातांच्या बोटांना लागल्याने तो जखमी झाला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 भाजी मंडईत पैशांच्या वादातून तरुणावर दगडाने हल्ला
मागील उसन्या पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून तरुणाला दोघांनी मारहाण केल्याची घटना आळंदीतील वडगाव रोडवरील भाजी मंडईत घडली. या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कृष्णा कोळेकर (वय २७, रा. कोयाळी, ता. खेड) हे ११ ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास भाजी मंडईत मेथीची भाजी विकत होते. त्यावेळी मागील उसन्या पैशांच्या व्यवहारावरून तुषार मोहन कोळेकर (वय २६) याने त्यांच्याशी वाद घातला. या वादातून अक्षय यांनी तुषार याला पाठीमागे ढकलले.
त्यानंतर तुषारचा चुलत भाऊ चैतन्य स्वार्तीक कोळेकर (वय २१) तेथे आला. दोघांनी अक्षय यांना हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मारहाणीदरम्यान चैतन्य याने अक्षय यांच्या मानेवर दगड मारल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तसेच अक्षय यांचे मोठे भाऊ कृणाल कोळेकर यांना शिवीगाळ करून कोयत्याने तोडून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी १२ ऑगस्ट रोजी रात्री ११.२१ वाजता आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ११५(२), ३(५) तसेच जुन्या भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३२३, ३४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
🔴 देहूरोडमध्ये २४१ ग्रॅम गांजा जप्त; एकाला अटक
देहूरोड पोलिसांनी साईनगर परिसरात बुधवारी (ता. १२) कारवाई करून २४१ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी समीर शिकर शेख (वय २९, रा. वडी गोदरी, ता. अंबड, जि. जालना) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई पंकज कैलास भदाणे यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे १० हजार ५०० रुपये आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनगर येथून मरगण टेपलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. आरोपी गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्याकडून २४१ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यातील कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------