धार्मिक कार्यक्रमांनी शहरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन साजरा
अभिषेक, गुरुचरित्र पारायण, 'श्री स्वामी समर्थ' मंत्रजप, आरती, पालखी सोहळा, भजन, किर्तन आणि महाप्रसाद वाटप आदि कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी, ता. २१ - स्वामींच्या मूर्तीला मंगलस्नान, अभिषेक, गुरुचरित्र पारायण, 'श्री स्वामी समर्थ' मंत्रजप, आरती, पालखी सोहळा, भजन, किर्तन आणि महाप्रसाद वाटप अशा कार्यक्रमांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगटदिन शुक्रवारी (ता. २०) शहरात साजरा झाला. स्वामींच्या शहरातील सर्व मंदिरांमध्ये भक्तांची दिवसभर दर्शनासाठी रांग लागली होती.
शहरात, चिंचवड, संत तुकारामनगर, बिजलीनगर, रावेत, मोरेवस्ती, थेरगाव, मासुळकर कॉलनी, निगडी, शिवतेजनगर-चिंचवड येथील स्वामींच्या मंदिरांमध्ये व अध्यात्मिक केंद्रा कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सर्वत्र भक्तांची मोठी गर्दी होती.
श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आकुर्डी केंद्रातर्फे गंगानगर येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. आरोग्य चिकित्सा शिबिर घेण्यात आले. आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहाटे मंदिरामध्ये होम हवन व अभिषेक करण्यात आला. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे सामुदायिकपणे पारायण करण्यात आले. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवन चरित्रावर सागर दाणी यांनी मार्गदर्शन केले. सेवेकऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गवळण, फुगड्या, भारुड, वासुदेव, वाघ्या नृत्य सादर केले. वर्षातील सणवार, व्रतवैकल्य यांची माहिती देऊन प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
चिंचवडमधील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाच्यावतीने श्री स्वामी समर्थ मठामध्ये विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे करण्यात आले. मंडळाच्या वतीने किराणा घराण्यातील गायक भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी आणि सहकाऱ्यांनी 'स्वरसमर्थ अभंगवाणी' हा भक्तिसंगीत कार्यक्रम मंगळवारी सादर केला.
पिंपळे गुरव व नवी सांगवी परिसरात विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये अभिषेक, आरती, नामस्मरण, भजन-कीर्तन, तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. 'अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय' हा जयघोष अखंडपणे कानी पडत होता. पिंपळे गुरव येथील रामनगर परिसरातील श्री स्वामी समर्थ दत्त दिगंबर सेवा ट्रस्टच्या वतीने नामस्मरण, आरती, प्रवचन, भजन सेवा, संगीत सेवा तसेच भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याशिवाय संगीत विशारद गणेश पुरवार यांची संगीत सेवा आयोजित करण्यात आली. विनायकनगर- नवी सांगवी येथे बाळासाहेब कुलकर्णी व स्वामी भक्त परिवारातर्फे स्वार्मीच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पिंपळे गुरव येथील साई धर्मावंत सोसायटीत धनाजी मोरे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप केले. या वेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झाले. १९ ते १७ मार्चदरम्यान श्रीपाद श्रीवल्लभपारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रकटदिनी सकाळी ६:३० वाजता अभिषेक, होम-हवन, महाआरती व विशेष पूजा विधी झाले. दिवसभर विविध भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
फुगेवाडी येथील श्री स्वामी समर्थ शक्तिपीठात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन व मूर्ती स्थापनेचा २७ वा वर्धापन दिन उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त दिनांक १३ ते १९ मार्च दरम्यान श्री गुरू लीलामृत व श्री गुरुदेव ग्रंथाचे पारायण, नामजप हे कार्यक्रम पार पडले. प्रकट दिनी शुक्रवारी सकाळी महापूजा, आरती तर दुपारी उत्सवाची आरती व नैवेद्य अर्पण करण्यात आला. सायंकाळी प्रकटीकरण सोहळा, पादुकांचे दर्शन, भजन सेवा, सामूहिक नामजप, सत्संग व दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नूतन नगरसेवक आणि नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. रात्री महाआरतीनंतर शेजारतीने उत्सवाची सांगता झाली. भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले, अशी माहिती शक्तिपीठाचे संस्थापक नंदकिशोर वाखारे यांनी दिली.