श्री क्षेत्र भीमाशंकर गावठाणाचे स्थलांतर होणार, ग्रामस्थांना नव्या गावात नवी घरे मिळणार
श्री क्षेत्र भीमाशंकर गावठाणाचे स्थलांतर होणार, ग्रामस्थांना नव्या गावात नवी घरे मिळणार
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
पुणे, ता. २४ - श्री क्षेत्र भीमाशंकर येथील गावठाणाचे दीडशे मीटर लांब जागेत स्थलांतर केले जाणार आहे.
या स्थलांतरास मान्यतेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. त्यानुसार आवश्यक असणाऱ्या खासगी जागेचे भूसंपादन करुन पुढील वर्षभरात याठिकाणी नव्याने गाव वसविण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी (ता. २३) दिली. ग्रामस्थांनी काही अटीशर्तींवर स्थलांतराच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले.
भीमाशंकर परीससरात पुढच्या वर्षी कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी सुमारे एक लाख भाविक दररोज मंदिराला भेट देण्याची शक्यता आहे. हे गावठाण मंदिराभोवती पसरले आहे. गावठाणातील ११० घरांमुळे मंदिराला येण्यासाठीचा रस्ता अरुंद होतो. त्यामुळे परिसरात चेंगराचेंगरी, आगीसारख्या घटना घडू शकतात. अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका आत जाऊ शकत नाही. त्यामुळे, जिल्हाधिकारी डुडी यांनी या गावठाणाचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांपुढे ठेवला होता. या प्रस्तावाला ग्रामस्थांनी एकमताने मंजुरी दिली. याबाबतचे अधिकृत पत्र ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले.
आता या प्रस्तावानुसार, भीमाशंकर गावठाणातील सुमारे १२५ कुटुंबांचे पुनर्वसन जवळील उपलब्ध ३६ एकर जागेत करण्यात येणार आहे. सध्याच्या गावाचे क्षेत्र ३७ हजार चौरस मीटर असून, प्रस्तावित गावाचे क्षेत्र ५२ हजार चौरस मीटर असेल. नवीन गावठाणात ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, समाजमंदिर, मध्यवर्ती सभागृह, बाजारपेठ आणि अन्य सुविधा देण्यात येणार आहेत. पुनर्वसनामुळे मंदिर परिसरात शाश्वत विकासासाठी दीर्घकालीन जागा उपलब्ध होईल. प्रस्तावित पुनर्वसन आराखड्यात एकूण ३६ एकर जागा उपलब्ध होणार आहे. सुमारे १८ ते २० एकर जागेचे भूसंपादन करण्याची गरज भासणार आहे. या नवीन वसाहतीत ८० टक्के घरे ५०० चौरस फुटांची असतील. २० टक्के घरे एक हजार चौरस फुटांची असतील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
गावठाण स्थलांतरीत झाल्यावर मंदिराच्या परिसरात ५ हजार ८०० चौरस मीटर जागा मोकळी होणार आहे. त्यामुळे भाविकांना अत्याधुनिक, सुव्यवस्थित सोयी उपलब्ध करुन देता येतील. या जागेमुळे एकाचवेळी सुमारे २५ हजार भाविकांना सहजपणे सामावून घेता येईल, गर्दीचे व्यवस्थापन सुलभ होईल आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक हालचाली करणे सहज शक्य होणार आहे, असेही प्रशासनाने सांगितले.
वर्षभरात ग्रामस्थांना नवीन घरांमध्ये प्रवेश देण्याचे नियोजन
गावठाणाच्या स्थलांतरास ग्रामस्थांनी मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. स्थलांतर करण्यासाठी खासगी जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी लागणारा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन गावठाण बांधण्यासाठीही निधीची मागणी करण्यात येणार आहे. संपूर्ण निधी प्राप्त झाल्यानंतर, कायदेशीर बाबी पार पडल्यानंतर वर्षभरात ग्रामस्थांना नवीन घरांमध्ये प्रवेश देण्याचे नियोजन आहे.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे