बोपखेलच्या रामनगरमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; चौघांना अटक

बोपखेलच्या रामनगरमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; चौघांना अटक

बोपखेल | २६ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील बोपखेलच्या रामनगर परिसरात जुन्या वादातून तरुण आणि त्याच्या मामाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर नाल्याजवळ झालेल्या वादात तरुणाच्या पोटावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने दोन वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बोपखेल येथील रामनगरमधील गुप्ता बिल्डिंगसमोर घडली.

या प्रकरणी हर्ष रतन वाल्मिकी (वय २२ वर्षे, रामनगर, बोपखेल, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्यात प्रदीप पिंचलरमणय्या पत्तीपाटी, पिंचलर मणय्या कोंडय्या पत्तीपाटी, निलेश अरविंद खरे आणि विकास मदनपाल सौदे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून , त्यांना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीनुसार, हर्ष वाल्मिकी यांचे मामा लक्ष्मण मेवाते हे बसलेले असताना आरोपींनी जुन्या वादाच्या कारणावरून त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर शिवीगाळ करून हर्ष आणि त्यांच्या मामाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

या घटनेनंतर हर्ष आणि त्यांच्या मामाचा मुलगा करण हे रामनगर परिसरातील नाल्याजवळ गेले होते. तेथे प्रदीप पत्तीपाटी याच्या वडिलांना विचारणा करत असताना प्रदीप, त्याचे वडील पिंचलर, निलेश खरे आणि विकास सौदे यांनी मिळून हर्ष यांना हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे.

याच वेळी विकास सौदे याने त्याच्याजवळ असलेल्या चाकूसारख्या धारदार शस्त्राने हर्ष यांच्या पोटावर दोन वार केले. या हल्ल्यात हर्ष गंभीर जखमी झाले. जिवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०६/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास दापोडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories