राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये विशेष मोहिमेचे आयोजन

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये विशेष मोहिमेचे आयोजन

पिंपरी | २६ ऑक्टोबर २०२६ : बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी, त्यांची पोषणस्थिती उंचावण्यासाठी आणि जंतसंसर्गापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शहरातील १ ते १९ वर्षे वयोगटातील पात्र बालके आणि विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

या मोहिमेत महापालिकेच्या शाळांसह शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित खासगी शाळा, अंगणवाडी केंद्रे, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलेल्या इतर शैक्षणिक संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शाळाबाह्य बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींनाही या मोहिमेचा लाभ मिळावा, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

शाळांमध्ये शिक्षकांच्या देखरेखीखाली जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. तर अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातून गोळ्यांचे वितरण केले जाणार आहे.

२७ ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळी घेऊ न शकलेल्या बालकांसाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘मॉप-अप दिन’ आयोजित करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी गोळी न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना मॉप-अप दिनी गोळी देण्याचे नियोजन आहे.

मोहिमेची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी, यासाठी शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना लाभार्थ्यांच्या नोंदी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय जंतनाशक दिनी गोळी दिलेल्या लाभार्थ्यांच्या नावापुढे एक खूण, तर मॉप-अप दिनी गोळी दिल्यानंतर दोन खुणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, बालकांच्या निरोगी वाढीसाठी जंतसंसर्गापासून संरक्षण महत्त्वाचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना या मोहिमेचा लाभ मिळवून द्यावा आणि महापालिकेला सहकार्य करावे.

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी जंतसंसर्गामुळे बालकांच्या आरोग्यावर आणि पोषणावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे स्पष्ट केले. पात्र बालकांपर्यंत जंतनाशक गोळ्या पोहोचवण्यासाठी शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील पालक, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories