वाकड | २६ ऑक्टोबर २०२६ : बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार वाकडमध्ये समोर आला आहे. सीनियर सिटिझन कार्ड बनवून देण्याच्या बहाण्याने बँक खात्याची माहिती मिळवून ही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सहा ते २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी चार वाजेपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला.
या प्रकरणी अमरजीत लाल चावला (वय ८५ वर्षे, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, दिलीप कुमार मिश्रा नावाच्या व्यक्तीने एका मोबाइल क्रमांकावरून त्यांच्याशी संपर्क साधला. आपण कोटक महिंद्रा बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगत त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर फिर्यादीला सीनियर सिटिझन कार्ड बनवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बँक खाते क्रमांक, डेबिट कार्डची माहिती आणि बँक पासबुकची माहिती मागविण्यात आली. या संदर्भात आरोपीने फिर्यादीशी व्हिडिओ कॉलद्वारेही संपर्क साधला. आरोपीच्या सांगण्यानुसार फिर्यादीने त्याला आवश्यक माहिती दिली.
दरम्यान, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादीने स्वतःच्या बँक खात्याचा एम-पिन टाकून खाते सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एम-पिन चुकीचा असल्याचे दिसून आले. याबाबत चौकशी करण्यासाठी फिर्यादी कोटक महिंद्रा बँकेच्या वाकड शाखेत गेले.
बँकेत चौकशी केल्यानंतर त्यांच्या खात्यातून २५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले. त्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर फिर्यादीने राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार नोंदवली.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.