सम्राट अशोकांचे राष्ट्रीय स्मारक पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याची मागणी

सम्राट अशोकांचे राष्ट्रीय स्मारक पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड | भारताचे महान सम्राट अशोक यांचे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय स्मारक पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात यावे, अशी मागणी दलित पॅंथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून, स्मारकासाठी योग्य जागा निश्चित करून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

दलित पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रशांतराजे कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात सम्राट अशोक यांच्या ऐतिहासिक कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सम्राट अशोक यांनी बंधुता, शांतता, अहिंसा आणि मानवी मूल्यांचा संदेश जगाला दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रात त्यांचे भव्य आणि अभ्यासपूर्ण स्मारक उभारण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

भारतीय राष्ट्रीय प्रतीकांमधील अशोकचक्र आणि चार सिंहांची राजमुद्रा यांचा संदर्भ देत सम्राट अशोक यांच्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व निवेदनातून अधोरेखित करण्यात आले आहे. स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनकार्याची, विचारांची आणि इतिहासाची माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी, अशी संघटनेची भूमिका आहे.

पिंपरी-चिंचवड हे पुरोगामी विचारांचे आणि वेगाने विकसित होणारे शहर असल्याने येथे सम्राट अशोकांचे स्मारक उभारल्यास ते राज्यासाठी महत्त्वाचे वैचारिक आणि सांस्कृतिक केंद्र ठरू शकते, असा विश्वास प्रशांतराजे कांबळे यांनी व्यक्त केला.

महापालिका प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी. स्मारकासाठी योग्य जागेची निश्चिती करावी आणि पुढील तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

या निवेदनानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन या प्रस्तावाबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories