पिंपरी | २१ ऑक्टोबर २०२६ : दसरा आणि विजयादशमीच्या निमित्ताने पिंपरीतील संत तुकारामनगर आणि वल्लभनगर परिसरात प्रथमच सीमोल्लंघन, पथसंचलन आणि सोनं लुटण्याचा पारंपरिक सोहळा उत्साहात पार पडला. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाचा शुभारंभ माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २०) करण्यात आला. या सोहळ्यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
राष्ट्रीय श्रमिक आघाडी आणि संत तुकारामनगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात पथसंचलनाला सुरुवात झाली.
पथसंचलनादरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर स्वामी मंदिरात दर्शन घेऊन बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करण्यात आले.
संत तुकारामनगर आणि वल्लभनगर यांच्या सीमारेषेवरील गणेश मंदिरात पारंपरिक सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. दोन्ही परिसरांतील नागरिकांनी एकत्र येत आपट्याची पाने एकमेकांना देऊन सोनं लुटण्याची परंपरा साजरी केली. या उपक्रमातून सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी माजी खासदार अमर साबळे म्हणाले की, विजयादशमीच्या सीमोल्लंघन परंपरेतून दुःखातून सुखाकडे आणि पराभवातून यशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते. यशवंतभाऊ भोसले यांनी या परिसरात नवी सांस्कृतिक परंपरा सुरू करून सामाजिक एकोप्याचा आदर्श निर्माण केला आहे.
यशवंतभाऊ भोसले यांनी सीमोल्लंघनाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व सांगितले. पूर्वी दोन गावांतील नागरिक सीमारेषेवर एकत्र येऊन शुभेच्छा देत आणि सोनं लुटण्याची परंपरा पाळत असत. त्याच परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात भोसले यांची सहा वर्षांची नात लिनेशा हिनेही प्रथमच पथसंचलन आणि सोनं लुटण्याच्या सोहळ्यात सहभाग घेतला.
कार्यक्रमाला माजी नगरसेवक बबनराव गाढवे, भाजप नेते किरण सुवर्णा, मंडलाध्यक्ष मंगेश धाडगे, नंदू कदम, महेंद्र बाविस्कर, दिनेश पाटील, शेखर पाटील, संदीप नाईक, चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, अनिकेत भोसले, दीपक पाटील, दत्ताजी गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.