शिक्षक-पदवीधर निवडणूक : पिंपरी-चिंचवडमध्ये मनाई आदेश जारी

शिक्षक-पदवीधर निवडणूक : पिंपरी-चिंचवडमध्ये मनाई आदेश जारी

पिंपरी-चिंचवड | २१ ऑक्टोबर २०२६ : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाने विविध मनाई आदेश जारी केले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण २० मतदान केंद्रे आणि ३५ बूथ असणार आहेत.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित विधानपरिषद मतदारसंघाचे मतदार नसलेल्या राजकीय व्यक्तींना किंवा राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्तींना त्या मतदारसंघात थांबण्यास अथवा वास्तव्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

शस्त्र परवानाधारकांनाही शस्त्रे ताब्यात ठेवण्यास आणि बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. छाननी समितीने सवलत दिलेल्या परवानाधारकांना या आदेशातून सूट असली, तरी निवडणुकीच्या कोणत्याही कार्यक्रमादरम्यान शस्त्र जवळ बाळगता येणार नाही.

मतदान आणि मतमोजणी होणाऱ्या ठिकाणांच्या १०० मीटर परिसरातील व्यावसायिक दुकाने, रेस्टॉरंट, टपऱ्या आणि इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे.

मतदान केंद्र आणि परिसरात कोणत्याही प्रकारची हत्यारे किंवा अग्निशस्त्रे बाळगण्यास मनाई असेल. कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित आदेशातून सूट देण्यात आली आहे.

तसेच मतदान केंद्रात मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास किंवा वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कर्तव्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा निर्बंध लागू होणार नाही.

या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ नुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories