चिंचवड | २६ नोव्हेंबर २०२६ : चिंचवड मध्ये एका कॅब चालकाला गाडी नीट चालवण्यास सांगितल्यानंतर झालेल्या वादात प्रवाशाचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. २४ नोव्हेंबर रोजी चिंचवडमधील शितल हॉटेलसमोरील रस्त्यावर ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ दिपक महाजन (वय २७, रा. वाकड) हे चाकणहून डांगे चौकात घरी जाण्यासाठी उबर कॅबने निघाले होते. यावेळी चालक गाडी वेडीवाकडी चालवत होता. यामुळे महाजन यांनी चालकाला गाडी नीट चालवा, नाहीतर मला खाली उतरवा, असे सांगितले.
यामुळे चालकाला राग आला आणि त्याने गाडी थांबवून प्रवासी महाजन यांना शिवीगाळ केला. तसेच भाड्याचे पैसे ऑनलाइन घेत असताना त्याने महाजन यांचा आयफोन १७ प्रो हिसकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महाजन गाडीतून उतरल्यावर चालक आणि त्याच्यासोबतच्या व्यक्तीने त्यांची लॅपटॉपची बॅगही हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि मोबाइल घेऊन निघून गेल्याचा आरोप आहे.
महाजन यांच्या तक्रारीवरून शुभम विठ्ठल शेलकर (रा. नाणेकरवाडी, चाकण) आणि ईश्वर शशिराव झांबरे (रा. पानसरी मळा, चाकण) यांच्याविरुद्ध पिंपरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबरला भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक केणे याचा तपास करत आहेत.