पिंपरी-चिंचवड : दिघीत तील काळूबाई मंदिरासमोर पिकअप टेम्पोने कारला धडक दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप आहे.
दयानंद बाबूराव तोरकडे (वय ४४, रा. दिघी) यांनी या घटनेची तक्रार नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास दिघी जकात नाक्याच्या पुढे काळूबाई मंदिरासमोर ही घटना घडली.
तोरकडे आपल्या कुटुंबासह कारमधून कुटुंबासह जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका पिकअप टेम्पोने त्यांच्या कारला धडक दिली. या धडकेत कारची डिक्की, बंपर, दोन्ही टेल लॅम्प आणि मागील भागाचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरुन पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
समाधान दशरथ कदम (वय २७, रा. निरगुडी) याच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, ३२४(४) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ व १७७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. शिंदे पुढील तपास करत आहेत.