भांडण सोडवणं पडलं महागात ; निघोजेत तरुणावर चाकूने वार

भांडण सोडवणं पडलं महागात ; निघोजेत तरुणावर चाकूने वार

पिंपरी-चिंचवड : पूर्वीचे भांडण सोडवण्यासाठी गेल्याचा राग धरून एका १९ वर्षीय तरुणाला मारहाण करत चाकूने वार केल्याची घटना निघोजे येथे घडली आहे. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार, निखील किसन भोयर (वय १९, रा. डोंगरवस्ती, निघोजे) यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी भोयर गेले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता.

गुरुवारी (५ नोव्हेंबर) रात्री भोयर मित्रासह पाणीपुरी खाण्यासाठी जात असताना डोंगरवस्ती परिसरात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. आयुष अरुण कदम (वय १९), जित प्रदीप तरकसे (वय १९), रोहित भारत शिंगाडे (वय १९) आणि ओमकार विजयानंद देशमुख (वय २३, सर्व सध्या रा. खराबवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तरकसे याने विटेच्या तुकड्याने भोयर यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. रोहित शिंगाडे आणि ओमकार देशमुख यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आणि आयुष कदम याने पॅन्टच्या खिशातून छोटा चाकू काढून कमरेच्या वर डाव्या बाजूला वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी शुक्रवारी  (६ नोव्हेंबर) भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार गाडीलकर पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories