पिंपरी-चिंचवड : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपल्या कुटुंबासोबत साजरा होणारा जिव्हाळ्याचा सण. मात्र, कुटुंबीयांपासून दुरावलेल्या आणि निराधार अवस्थेत जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी हा सण एकटेपणाची जाणीव करून देणारा असतो. अशाच व्यक्तींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी पिंपरीतील ‘सावली’ निवारा केंद्रातील ७५ बेघर व्यक्तींसोबत दिवाळी साजरी केली.
यावेळी आयुक्तांनी लाभार्थ्यांसोबत फराळ केला. प्रत्येकाशी संवाद साधून त्यांच्या राहणीमानाची,आरोग्याची आणि केंद्रातून मिळणाऱ्या सुविधांची माहिती जाणून घेतली. संवादादरम्यान काही लाभार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील संघर्ष आणि कठीण प्रसंग सांगितले. त्यांच्या अनुभवांविषयी जाणून घेताना आयुक्त भावूक झाले.
यावेळी त्यांनी निराधार व्यक्तींना पुन्हा जगण्याचा आधार देण्यासाठी सावली केंद्राकडून सुरू असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. याशिवाय त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून केंद्राच्या दैनंदिन कामकाजाची, लाभार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची आणि संस्थेला भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती घेतली.
तसेच केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून लाभार्थ्यांची घेतली जाणारी काळजी, त्यांना दिला जाणारा सन्मान आणि आपुलकीच्या वातावरणाचेही आयुक्तांनी कौतुक केले. दरम्यान, आयुक्तांनी केंद्रातील स्थापत्यविषयक समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.