पिंपरी-चिंचवड | २३ ऑक्टोबर २०२६ : इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओवरून झालेल्या वादातून इयत्ता नववीतील विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना म्हाळुंगे परिसरातील एका खासगी शाळेत घडली आहे. या हल्ल्यात विद्यार्थिनी जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी पाचगणी आणि महाबळेश्वर येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीदरम्यान झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात काही विद्यार्थिनी नृत्य करत होत्या. त्यावेळी एका विद्यार्थ्याने त्यांचा व्हिडिओ चित्रित करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.
या व्हिडिओवरून विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ हटवावा लागला. याच कारणावरून त्याच्या मनात राग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगे परिसरातील खासगी शाळेत संबंधित विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात खळबळ उडाली.
हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बावधन पोलिसांनी विद्यार्थिनीचा जबाब नोंदविला. तसेच हल्ल्याच्या प्रकरणात संबंधित अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शैक्षणिक सहलीदरम्यान चित्रित केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर थेट हिंसक घटनेत झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. विशेषतः सोशल मीडियाचा वापर, विद्यार्थ्यांमधील मतभेद आणि शाळेतील सुरक्षितता या मुद्द्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.