रणरणत्या उन्हात अनवाणी उपोषण करणार, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची ठाम भूमिका
May 28 2026
33
रणरणत्या उन्हात अनवाणी आमरण उपोषण करणार, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची ठाम भूमिका
पुणे, ता. २८ - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी ३० मे रोजी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे पुन्हा एकदा मोठे आंदोलन आणि बेमुदत उपोषण करणार आहेत. या उपोषणात ते अन्न, पाणी घेणार नाहीत आणि पायात चप्पलही घालणार नाहीत. उष्माघाताने आपला बळी गेला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण सरकार जबाबदार राहील, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. गुरुवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत त्यांनी आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे.
मराठा समाजाची शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. ते म्हणाले, तीन वर्षांपासून आंदोलन सुरु असताना सरकार चर्चेसाठी सतत वेळ मागत आहे. आता थांबता येणार नाही. उष्माघाताने आपला बळी गेला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण सरकार जबाबदार राहील. कायद्याच्या चौकटीत राहूनच हे उपोषण होईल. सरकारने मराठा समाजातील मुलांचा उन्हाळा करून टाकल्यामुळे आता माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही.
सातारा गॅझेटचा निर्णय अद्याप झालेला नाही. एका महिन्याच्या मुदतीत माहिती देण्याचे आश्वासन दिले होते, तरी दहा महिने उलटले तरी काहीच झाले नाही. गुन्हे दाखल करून आंदोलकांवर दबाव टाकला जातो, पण गुन्हे मागे घेतले जात नाहीत. मराठा-कुणबी एकच आहेत, असे वारंवार सांगितले जाते, तरीही एकत्रित जीआर काढला जात नाही. मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासाठी किती वेळ लागणार असा प्रश्न उपस्थित करुन १९६७ पासून सरकारने मराठा समाजाचे वाटोळे केले, असे जरांगे म्हणाले.
समाजाचे नुकसान कोण भरून काढणार, असा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. उपोषण स्थळी कोणीही येऊ नये. उपोषण स्थळी फक्त पत्रकारांसाठी एक छोटा मंडप उभारला जाईल, बाकी संपूर्ण उपोषण रणरणत्या उन्हातच होईल, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.