रहाटणीतील आनंद बुद्ध विहारात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

रहाटणीतील आनंद बुद्ध विहारात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

पिंपरी-चिंचवड | २१ ऑक्टोबर २०२६ : जगभरात युद्ध, द्वेष आणि हिंसाचाराचे सावट असताना मानवतेच्या कल्याणासाठी भगवान गौतम बुद्धांचा शांती, समता, करुणा आणि बंधुभावाचा विचार आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी केले.

रहाटणी येथील आनंद बुद्ध विहारात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्रिभुवन यांनी बुद्धांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले.

आज विविध देशांमधील संघर्ष, हिंसाचार आणि सत्तासंघर्षामुळे मानवतेसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला शांती, करुणा, प्रज्ञा आणि बंधुभावाचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. युद्ध आणि द्वेषातून प्रश्न सुटत नाहीत. संवाद, सहिष्णुता आणि परस्पर आदरातूनच शांततेचा मार्ग निर्माण होऊ शकतो, असे त्रिभुवन यांनी सांगितले.

यावेळी आनंद बुद्ध विहाराचे सचिव पोपट कदम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करून समाजाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांचे आचरण करून अन्यायमुक्त आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन कदम यांनी केले.

या कार्यक्रमाला आनंद बुद्ध विहाराचे अध्यक्ष महादेव कांबळे, सचिव पोपट कदम, प्राध्यापक प्रभाकर दाभाडे, महिला अध्यक्षा अनिता साळवी, समता सैनिक दलाच्या कमांडर अंजना कांबळे, खजिनदार शशिकांत शेलार, संघटक सखाराम कांबळे, मनोहर लांडगे, प्रकाश सूर्यवंशी, शांता कांबळे, अलका लांडगे, सुमन मूळ, निर्मला कदम, संगीता साळवे, प्रवीण लोखंडे, श्रीमंत कदम आणि रामभाऊ मुळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories